कोविड काळात मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी रिलायन्सची योजना

रिलायन्स इंडस्ट्रीजने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी एक पत्र लिहिलं आहे.
Mukesh Ambani
Mukesh Ambani

मुंबई : कोविडमुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांसाठी आणि वारसांसाठी रिलायन्सने मोठी घोषणा केली आहे. अशा कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला आधार मिळावा यासाठी कंपनीनं काही कल्याणकारी योजना जाहीर केल्या आहेत. यामध्ये मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याच्या वारसांना त्या कर्मचाऱ्याच्या पगाराइतकी रक्कम प्रत्येक महिन्याला पाच वर्षांपर्यंत दिली जाणार आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी एक पत्र लिहिलं आहे. यामध्ये चेअरमन मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी म्हटलं की, 'करोना काळात प्रत्येकालाच कटू अनुभवाचा सामना करावा लागला. आपले सहकारी, नातेवाईक आणि प्रिय व्यक्तीच्या मृत्यूच्या धक्क्यातून आपण सावरत आहोत. प्रिय व्यक्तीच्या निधनामुळे निर्माण झालेली पोकळी कधीही भरुन निघणार नाही. 'रिलायन्स एक कुटुंब' या वचनानुसार, या कठीण काळात कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला सहकार्य करण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. त्यांना या कठीण काळाचा सामना करता यावा यासाठी पाठबळ देऊ आणि त्यांना मदतही करू, असे अंबानी यांनी म्हटले आहे.

We care हे आमचे वचन असून या धाग्यानेच आपण सर्व जोडले गेलो आहोत आणि कर्मचाऱ्यांची काळजी घेणे याला आम्ही प्राधान्य देतो. रिलायन्समध्ये कर्मचारी आणि त्यांचे कुटुंब सर्वप्रथम असल्याचे अंबानी यांनी सांगितले. सध्याचा काळ हा खूपच अंधकारमय आहे. मात्र, आपण एकटे आहात असे समजू नका. कारण रिलायन्स कायमच आपल्या प्रत्येकाच्या आणि तुमच्या कुटुंबासोबत असल्याचे सांगत अंबानी यांनी 'दि रिलायन्स फॅमिली सपोर्ट अँड वेलफेअर स्कीम' जाहीर केली. अंबानी म्हणाले, "रिलायन्स पुढील पाच वर्षांपर्यंत कोविडमुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसदारांना दरमहा आर्थिक मदत करणार आहे. कर्मचाऱ्याच्या खात्यात गेल्या महिन्यात जमा झालेल्या पगाराइतकी रक्कम पुढील पाच वर्षांसाठी त्यांच्या वारसदारांना दिली जाणार आहे"

कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी कल्याणकारी योजना

मृत कर्मचाऱ्यांच्या सर्व मुलांना देशातील कोणत्याही शैक्षणिक संस्थेमध्ये पदवीपर्यंत ट्यूशन आणि हॉस्टेलमध्ये राहण्याच्या १०० टक्के खर्चासह पुस्तकांचा खर्चही दिला जाणार आहे. याशिवाय निधन झालेल्या कर्मचाऱ्याची पत्नी, आई-वडील आणि मुलांना (पदवीपर्यंत) रुग्णालयात दाखल होण्याची गरज पडल्यास कंपनी १०० टक्के विम्याची रक्कमही भरेल. त्याचबरोबर रिलायन्सने आपल्या ऑफरोल कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांसाठी मदत आणि कल्याणकारी योजनांचीही घोषणा केली आहे. ऑफरोल कर्मचाऱ्याचा जर कोविडने मृत्यू झाला असेल तर त्याच्या वारसांना १० लाख रुपये एक रकमी नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. त्याचबरोबर जर कोणताही कर्मचारी किंवा त्याच्या कुटुंबात कोणी कोविडने आजारी असेल तर त्याला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या ठीक होईपर्यंत विशेष कोविड लीव्ह देण्यात येईल, असे अंबानी यांनी पत्रात म्हटले आहे.

कर्मचाऱ्यांनी आपली लढाऊ वृत्ती कायम ठेवावी

सध्याच्या बिकट काळात रिलायन्सच्या कर्मचाऱ्यांनी आपली लढाऊ वृत्ती कायम ठेवावी, कारण पुढे आपल्या सर्वांसाठी नक्कीच चांगले दिवस येणार आहेत. पण तोपर्यंत आपण आपल्या ज्या सहकाऱ्यांनी आपल्या कुटुंबातील कर्ती व्यक्ती म्हणजेच सर्वस्व गमावलं आहे, त्या कुटुंबाला धैर्य आणि ताकद देण्याचं काम आपल्याला करायचं आहे. तसेच एकमेकांना सहकार्य करायचं असून भविष्याबाबत आशावादी रहायचं आहे, असं आवाहनही मुकेश आणि नीता अंबानी यांनी केलं आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी आणि त्यांच्या वारसांसाठी तयार केलेल्या या योजनांची संपूर्ण माहिती ESS आणि R-Connect पोर्टलवर उपलब्ध आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com