पाकिस्तानच्या सांगण्यावरुन शुजात बुखारी यांची हत्या 

वृत्तसंस्था
सोमवार, 25 जून 2018

जम्मू काश्मीरमधील द रायजिंग काश्मीर या वृत्तपत्राचे संपादक शुजात बुखारी यांची हत्या पाकिस्तानच्या सांगण्यावरून झाली असल्याचा दावा काश्मीर पोलिसांनी केला आहे. दहशतवाद्यांनी शुजात बुखारींची हत्या केली तसे त्यांना पाकिस्तानातून आदेश आले होते, असे या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

श्रीनगर(जम्मू-काश्मीर) - जम्मू काश्मीरमधील द रायजिंग काश्मीर या वृत्तपत्राचे संपादक शुजात बुखारी यांची हत्या पाकिस्तानच्या सांगण्यावरून झाली असल्याचा दावा काश्मीर पोलिसांनी केला आहे. दहशतवाद्यांनी शुजात बुखारींची हत्या केली तसे त्यांना पाकिस्तानातून आदेश आले होते, असे या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

जमात-ए-इस्लामीच्या लोकांनी दहशतवाद्यांना भडकावले होते. त्यांना शुजात बुखारींची ओळख पटवून दिली व त्यांची हत्या करण्यास सांगितले. म्हणूनच, शुजात बुखारी यांची हत्या करण्यात आली, असे या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. त्यांची हत्या करणाऱ्यांची ओळख पटली असून लवकरच आम्ही त्यासंदर्भात कठोर कारवाई करु, असे अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले आहे.

शुजात बुखारी यांच्या जवळचे मानले जाणारे पाकिस्तानचे पत्रकार इर्शाद मोहम्मद यांची उर्दुमध्ये लिहलेली फेसबुक पोस्टही पोलिसांनी तपासली आहे. इर्शाद मोहम्मद दुबई येथील शांतता परिषदेला हजर राहणार होते. ही शांतता परिषद जमात-ए-इस्लामींसाठी डोकेदुखी ठरणार होती अशी माहिती आहे. शांतता परिषद, इर्शादची उर्दुमधून लिहलेली फेसबुक पोस्ट, आणि दहशतवाद्यांनी केलेले आरोप या सर्व गोष्टींचा पोलिस बारकाईन तपास करत आहेत.

दरम्यान, जम्मू काश्मीरमधील द रायजिंग काश्मीर या वृत्तपत्राचे संपादक शुजात बुखारी यांची (वय 50) यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या हल्ल्यात बुखारी यांचा सुरक्षारक्षकही मारला गेला. लाल चौक येथील प्रेस एन्क्‍लेव्ह येथील कार्यालयातून बुखारी हे इफ्तार पार्टीसाठी निघाले होते. त्याचवेळी हल्लेखोरांनी जवळून त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला. हल्ल्याचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न करणारे दोन सुरक्षा कर्मचारीही त्यावेळी जखमी झाले. त्यांना तातडीने दवाखान्यात नेण्यात आले. मात्र शुजात बुखारी आणि एका सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाला.

Web Title: Rising Kashmir editor Shujaat Bukhari killed on orders from Pakistan, says Jammu and Kashmir police