Video : धक्कादायक! बससाठी विद्यार्थी जिवावर उदार

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 24 September 2019

आज (ता. 24) या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर बसचालकांचा मस्तवालपणा आणि परिवहन मंडळाच्या नियोजनाचा फाफटपसारादेखील समोर आला आहे. 

खानापूर (बेळगाव) : नंदगड-बिडी रस्त्यावर बेकवाड फाट्यावर बस थांबविण्यासाठी विद्यार्थ्यांना जीवावर उदार व्हावे लागल्याची घटना घडली आहे. बसच्या प्रतिक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या थेट अंगावर बस नेण्याचा धक्कादायक प्रकार खानापूर तालुक्यात घडला आहे.

तालुक्यातील बससेवा विस्कळीत झाल्याने त्याचा सर्वाधिक फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. मागील आठवड्यात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी बसवर दगडफेक केल्याची घटना ताजी असतानाच आता आज (ता. 24) घडलेल्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर बसचालकांचा मस्तवालपणा आणि परिवहन मंडळाच्या नियोजनाचा फाफटपसारादेखील समोर आला आहे. 

पोलिस महिलेला जाळून मारण्याचा प्रयत्न

बेकवाडहून खानापूर आणि नंदगडला येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फाट्यावर बस थांबविली जात नाही. हा नेहमीच प्रकार असल्याने संतापलेल्या विद्यार्थ्यांनी रस्त्यावर थांबून बस रोखण्याचा प्रयत्न केला. पण, चालकांने बस थांबविली नाही. एक विद्यार्थी बससमोर आला तरी बस थांबविण्याचे सौजन्य चालकांने दाखविले नाही. हा प्रकार इतका भयंकर होता, की ती चित्रफित पाहणाऱ्यांच्या अंगावर काटा उभा राहतो.

757 बंदुका, रिव्हॉल्व्हर होणार जमा

मागील आठवड्यात इदलहोंड फाट्यावर विद्यार्थ्यांनी बसवर दगडफेक केली होती. तर जांबोटीतील विद्यार्थ्यांनी रास्तारोको करून बससेवा सुरळीत करण्याची मागणी केली. नंदगड, हलशी, शिरोली, बिडी, गर्लगुंजी या गावातील विद्यार्थ्यांनीदेखील वेळोवेळी आंदोलने हाती घेतली. तरीही सेवा सुरळीत होत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. 

बेकवाडच्या घटनेने परिवहन मंडळ आणि खानापूर बस आगाराचा कारभार चव्हाट्यावर आणला आहेच. शिवाय तालुक्यातील लोकप्रतिनिधींच्या कार्यक्षमतेवरही बोट ठेवले आहे. आतातरी या सर्व घटकांना जाग येणार का हा प्रश्नच आहे. स्थानिक आगाराचे व्यवस्थापक चंद्रशेखर लोखंडे यांनी नेहमीच्याच स्टाईलमध्ये सदर घटनेची चौकशी करू, अशी त्रोटक प्रतिक्रीया दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: risky travelling by students at Khanapur Belgaon