रिटा बहुगुणा-जोशी यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 20 ऑक्टोबर 2016

नवी दिल्ली - विधानसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर उत्तर प्रदेशात कॉंग्रेसला मोठा धक्का बसला असून, पक्षाच्या माजी प्रदेशाध्यक्ष आणि ज्येष्ठ नेत्या रिटा बहुगुणा-जोशी यांनी आज थेट कॉंग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडत भाजपमध्ये प्रवेश केला. या वेळी पक्षाचे अध्यक्ष अमित शहादेखील उपस्थित होते. मागील दोन दिवसांपासून रिटा बहुगुणा यांच्या भाजपप्रवेशाची चर्चा सुरू होती. कॉंग्रेसचे बडे नेते मात्र याचा इन्कार करत होते.

कॉंग्रेस पक्षामध्ये राहुल गांधी यांचे कोणी ऐकत नाही, तळागाळामध्ये आता पक्ष शिल्लकच राहिलेला नाही, असा घणाघाती आरोप त्यांनी केल्यानंतर कॉंग्रेस नेते खवळले आहेत. याच मुद्यावरून उत्तर प्रदेश कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राज बब्बर यांनी आज त्यांच्यावर प्रतिहल्ला चढविला. रिटा यांच्या जाण्याने कॉंग्रेस पक्षावर कोणताही प्रतिकूल परिणाम होणार नाही. त्यांचे बंधू उत्तराखंडमध्ये भाजपच्या सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतरही त्याचा आमच्या पक्षावर परिणाम झाला नाही. रिटा या कधी काळी इतिहासाच्या प्राध्यापक होत्या, त्यामुळे त्यांच्याकडून इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. राहुल यांच्या "खून की दलाली' या विधानावर भाष्य करताना ते म्हणाले, की राहुल यांच्या विधानामागील भावना कोणीच लक्षात घेतल्या नाहीत. कॉंग्रेसनेच रिटा बहुगुणा यांना दोन वेळेस उत्तर प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष केले होते, याचा त्यांना विसर पडला आहे.

भाजपच्या बड्या नेत्यांना बंडखोरांची फौज तयार करायची असून, रिटा यांच्या जाण्याने पक्षावर कसलाही परिणाम होणार नाही. रिटा जोशी यांनी पक्ष बदलण्याची ही चौथी पाचवी वेळ असून, पुढील निवडणुकीच्या वेळीस कदाचित त्या दुसऱ्या पक्षात असतील.
- राज बब्बर, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष

अशा राजकीय आव्हानांना तोंड देत आमचा पक्ष पुढे जाईल. रिटा बहुगुणा या राजकीय संधीसाधू आहेत.
- संजय झा, कॉंग्रेस नेते.

कॉंग्रेसमध्ये उपाध्यक्ष राहुल गांधी यांना कोणीच जुमानत नाही, तळागाळात पक्ष उरलेलाच नाही. पक्षाचे नियोजित कार्यक्रम केवळ एक दिवस आधी नेत्यांना सांगितले जातात.
- रिटा बहुगुणा-जोशी, माजी कॉंग्रेस नेत्या

Web Title: rita bahuguna-joshi entry in bjp