थर वाळवंटात सापडली 172 हजार वर्षांपूर्वीची नदी

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 22 October 2020

राजस्थानमधील जनतेची जीवनवाहिनी असणारी, त्यांच्या भरभराटीला कारणीभूत असणारी आणि नंतर आटलेल्या नदीचे पुरावे संशोधकांना आढळून आले आहेत.

नवी दिल्ली - सुमारे १७२ हजार वर्षांपूर्वी राजस्थानमधील जनतेची जीवनवाहिनी असणारी, त्यांच्या भरभराटीला कारणीभूत असणारी आणि नंतर आटलेल्या नदीचे पुरावे संशोधकांना आढळून आले आहेत. याबाबतचा अहवाल ‘क्वाटर्नरी सायन्स रिव्ह्यूज्‌’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे. या अहवालानुसार, राजस्थानातील बिकानेरजवळ थरच्या वाळवंटात मध्य भागात ही नदी १७२ हजार वर्षांपूर्वी अस्तित्वात होती. श्‍मयुगाच्या या काळात थर प्रदेशाचे चित्र वेगळे होते. या नदीच्या वाहण्याने जमिनीच्या थरांमध्ये झालेले बदल ओळखू आले आहेत. 

नदीतील वाळूचे पुरावेही मिळाले आहेत. सध्या वाहणाऱ्या नदीमुळे तसेच, आता आटलेल्या घग्गर-हाक्रा नदीच्या मार्गावर तयार झालेली वळणे आणि जमिनीवरील तिचा परिणाम यांच्याशी या प्राचीन नदीशी तुलना करता त्यात बरेच साम्य असल्याचे आढळून आले. या पुरातन नदीच्या ठिकाणापासून सध्याची सर्वांत जवळची नदी २०० किलोमीटर दूर आहे.

देश विदेशातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

अभ्यासातील इतर निष्कर्ष
- थर प्रदेशात पूर्वीच्या काळी नद्यांचे जाळे असणे शक्य
- उपग्रहातून घेतलेल्या छायाचित्रांमधून या जाळ्याचा अंदाज
- नळ गावाजवळ नदीतील मातीचे पुरावे
- अश्‍मयुगातील मानवाचे आफ्रिकेतून भारतात झालेल्या स्थलांतराशी या नदीचा संबंध शक्य

यांचा संशोधनात सहभाग
- द मॅक्स प्लँक इन्स्टिट्युट फॉर द सायन्स ऑफ ह्युमन हिस्टरी (जर्मनी)
- अन्ना विद्यापीठ (तमिळनाडू)
- आयसर (कोलकता) 

थरच्या मध्य भागातून त्यावेळी वाहणाऱ्या नदीमुळेच येथे नागरी संस्कृती उदयास आली असू शकते. तसेच, ही नदीचा वाहतुकीसाठीही उपयोग होत असावा, असा संशोधकांचा अंदाज आहे. इतिहासाचा अभ्यास करताना आटलेल्या नद्यांच्या पुराव्यांकडे दुर्लक्ष केले गेले असल्याची नोंदही संशोधकांनी केली आहे. थर प्रदेशाला समृद्ध इतिहास असून अश्‍मयुगात येथे राहणाऱ्या मानवाने संभाव्य खराब वातावरणाचा सामना करताना कशाप्रकारे संस्कृती निर्माण केली, याचे आम्ही पुरावे गोळा करत आहोत, असे मॅक्स प्लँक इन्स्टिट्युटमधील संशोधक जिम्बोब ब्लिंकहॉर्न यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: river found in thar dessert show research