उत्तरप्रदेशमध्ये भीषण अपघात ; 13 विद्यार्थ्यांचा मृत्यू

वृत्तसंस्था
गुरुवार, 26 एप्रिल 2018

''या स्कूल व्हॅनमधून एकूण 18 विद्यार्थी प्रवास करत होते. त्यापैकी 11 विद्यार्थी जखमी झाले असून, 7 विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे''.

- आनंद कुमार, सहाय्यक पोलिस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था)

लखनौ : उत्तरप्रदेशमधील कुशीनगर येथे रेल्वे आणि स्कूल व्हॅनमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात व्हॅन चालकासह 13 शालेय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून, 7 विद्यार्थी जखमी झाले आहेत. ही व्हॅन 20 विद्यार्थ्यांना घेऊन जात असताना हा अपघात झाला. एका मानवरहित रेल्वे क्रॉसिंगवर हा अपघात झाला. 

UP School van accident

येथील एका स्कूल व्हॅनच्या चालकाने क्रॉसिंग करताना रेल्वे येत असल्याची खात्री केली नाही. त्यामुळेच हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. हा अपघात गुरुवारी सकाळी झाला. याबाबतची माहिती मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतली असून, या घटनेबाबत त्यांनी दु:ख व्यक्त केले आहे. या घटनेतील बाधितांना आवश्यक सर्व वैद्यकीय मदत देण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. याशिवाय मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाखांची मदतही जाहीर करण्यात आली आहे. त्याचबरोबर या घटनेच्या चौकशीचे आदेशही मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी दिले आहेत.

''या स्कूल व्हॅनमधून एकूण 18 विद्यार्थी प्रवास करत होते. त्यापैकी 11 विद्यार्थी जखमी झाले असून, 7 विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे'', अशी माहिती सहाय्यक पोलिस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) आनंद कुमार यांनी दिली.

Web Title: Road Accident 13 School Students Dead In Kushinagar