मध्य प्रदेशातील रस्ते अमेरिकेपेक्षा भारी: शिवराजसिंह

वृत्तसंस्था
बुधवार, 25 ऑक्टोबर 2017

मध्य प्रदेशात सर्व गावांना जोडण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. मध्य प्रदेशात आम्ही 1.75 लाख किमीचे रस्ते बांधले आहेत. भारताचा आर्थिक विकास दर 7 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. पायाभूत सुविधांविषाय विकास होऊ शकत नाही.

वॉशिंग्टन : वॉशिंग्टनमध्ये उतरल्यानंतर रस्त्याने प्रवास करताना मला जाणवले की अमेरिकेतील रस्त्यांपेक्षा मध्य प्रदेशातील रस्ते चांगले आहेत, असा दावा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केला आहे.

अमेरिकी थिंक टॅंक 'फाउंडेशन ऑफ इंडिया ऍण्ड इंडियन डायसपोरा' (एफआयआयडीएस) आणि भारतीय दूतावास यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. चौहान हे सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. शिवराजसिंह यांच्या या वक्तव्यामुळे सोशल मिडीयावर त्यांना लक्ष्य बनविण्यात येत आहे.

शिवराजसिंह म्हणाले, की मध्य प्रदेशात सर्व गावांना जोडण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. मध्य प्रदेशात आम्ही 1.75 लाख किमीचे रस्ते बांधले आहेत. भारताचा आर्थिक विकास दर 7 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. पायाभूत सुविधांविषाय विकास होऊ शकत नाही. भारतात जीएसटीची अंमलबजावणी झाल्याने गुंतवणूकदारांना मोठी संधी आहे. पंतप्रधान मोदींनी सुरु केलेल्या अनेक योजनांमुळे अर्थव्यवस्था सुधारत आहे. 

हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी भारताकडून पावले उचलली जात असून, जगाला वाचविण्यासाठी अमेरिकेसह इतर देशांनीही आपली भूमिका निभवावी, असे आवाहन आज मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केले.

Web Title: Roads in MP are better than U.S.: Shivraj Singh Chouhan