Nitishkumar
Nitishkumar

आरक्षणाची खेळी; जातीनिहाय जागांची नितीशकुमार यांची भूमिका

पाटणा - विविध जातींसाठी त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण असावे, अशी भूमिका बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आज मांडली. जणगणना केल्यानंतर याबाबतचा निर्णय घेता येऊ शकतो, असेही त्यांनी लगेच स्पष्ट केले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शिक्षण, बेरोजगारी आणि रोजगार या समस्यांवर केंद्रीत असलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आता आरक्षणाचा मुद्दा आला आहे. ‘प्रत्येक जातीच्या लोकसंख्येनुसार आरक्षण असावे याबाबत कोणतेही दुमत नाही. मला मतांची चिंता नाही. जनतेने काम करण्याची संधी दिली, आम्ही काम करून दाखविले. आता जनतेसमोर आलो आहोत. काम करण्याची पुन्हा संधी मिळाली तर आणखी काम करेन, तुमच्याशी चर्चा करून राहिलेल्या समस्याही सोडवू,’ अशी भूमिका नितीशकुमार यांनी पश्चिम चंपारणमधील वाल्मीकीनगर येथे प्रचारसभेत मांडली. वाल्मीकीनगरमध्ये सात नोव्हेंबरला लोकसभेच्या एका जागेसाठी पोट निवडणूक होत आहे. संयुक्त जनता दलाचे खासदार वैद्यनाथ महातो यांच्या निधनामुळे ही निवडणूक होत आहे. 

वाल्मीकीनगरमध्ये थारू जातीच्या नागरिकांचे प्राबल्य आहे. त्यांनी आरक्षणाची आग्रही मागणी केली आहे. त्याचे समर्थन नितीशकुमार यांनी केले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी संपूर्ण देशासाठी काम करीत आहेत आणि बिहारच्या विकासासाठी विशेष साह्य पुरवीत आहेत, असे सांगितले.

सत्तेवर आल्यास मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत दहा लाख नोकऱ्या देण्याच्या राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्या आश्वासनावर टीका करताना ते म्हणाले, ``राष्ट्रीय जनता दल १५ वर्षे सत्तेत होते. त्यांनी ९५ हजार नागरिकांना नोकऱ्या दिल्या. तर माझ्या कारकिर्दीत सहा लाख जणांना नोकऱ्या देण्यात आल्या, तर कामाच्या इतर संधीही उपलब्ध झाल्या.`

काही जण समाजात दुफळी माजविण्याच्या प्रयत्नात आहेत. परंतु, माझी तुम्हा सर्वांना हात जोडून विनंती आहे की अशा लोकांच्या कारस्थानाला बळी पडू नका. माझ्यासाठी संपूर्ण बिहार हे माझे कुटुंब आहे. काही जण मात्र केवळ स्वतःसाठी, पत्नी व मुलांसाठी काम करतात, असेही नितीशकुमार म्हणाले.

‘मुख्यमंत्र्यांच्या मुलांना दहावीसाठी मदत करू’
पाटणा - ‘‘जर आम्ही सत्तेवर आलो तर दोन माजी मुख्यमंत्र्यांच्या (लालू प्रसाद यादव व राबडी देवी) मुलांना दहावीची परीक्षा उत्तीर्ण होण्यास मदत करून, अशा शब्दांत भाजपचे बिहार प्रदेशाध्यक्ष संजय जैस्वाल यांनी तेजस्वी यादव यांचा समाचार घेतला. 

मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सत्ताकाळात बिहारमधील शिक्षण व आरोग्य व्यवस्था खिळखिळी झाली असल्याची टीका तेजस्वी यादव प्रचारात करीत आहेत. त्याचा समाचार घेताना  
जैस्वाल म्हणाले की, जर तुम्ही गेल्या १५ वर्षांतील शिक्षणाबद्दल असाल मुख्यमंत्री असलेल्या नितीश कुमार यांनी विद्यार्थ्यांना सायकल, पुस्तके व गणवेश वाटप केले आहे. मात्र आधीच्या दोन मुख्यमंत्र्यांना त्यांच्या मुलांना दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण करता आले नाही.

‘मतांची चिंता नाही’
वाल्मिकीनगरमध्ये थारू जातीचे मतदार मोठ्या संख्येने आहेत. या जातीचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये करण्याची मागणी होत आहे. यावर बोलताना नितीशकुमार म्हणाले की, अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात रेल्वे मंत्री असल्यापासून मी थारू जातीला आरक्षणाचा लाभ मिळावा, असा प्रयत्न करीत आहे. हा निर्णय माझ्या हातात नसली तरी यापुढेही यासाठी प्रयत्न करेन. यासाठी मला मतांची चिंता नाही.

नितीशजींनी हे मान्य केले की त्यांच्या १५ वर्षांच्या सत्ताकाळात त्यांनी बिहारमधील शिक्षण, आरोग्य, उद्योग क्षेत्र उद्‍ध्वस्त केले. त्यांनी वर्तमान आणि भविष्यातील दोन पिढ्याही नष्ट केल्या आहेत.
- तेजस्वी यादव, राजद नेते

गेल्या दहा वर्षांत एक कोटी विद्यार्थी बारावी उत्तीर्ण झाले आहेत. त्या सर्वांना का नाही नोकऱ्या द्यायच्या? त्यासाठीचे पैसे काय आकाशातून पडतील का? 
- नितीशकुमार, मुख्यमंत्री, बिहार

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com