लाच प्रकरणात रोल्स राॅइसवर गुन्हा

पीटीआय
बुधवार, 31 जुलै 2019

भारतीय कंपन्यांचे कंत्राट मिळवताना मध्यस्थामार्फत सुमारे ७५ कोटींची लाच दिल्याप्रकरणी सीबीआयने आज ब्रिटनची रोल्स राॅइस कंपनी आणि भारतातील उपकंपनीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

नवी दिल्ली - भारतीय कंपन्यांचे कंत्राट मिळवताना मध्यस्थामार्फत सुमारे ७५ कोटींची लाच दिल्याप्रकरणी सीबीआयने आज ब्रिटनची रोल्स राॅइस कंपनी आणि भारतातील उपकंपनीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ४,७०० कोटींच्या कंत्राटांसाठी ही लाच दिली गेली होती. ‘एचएएल’, ‘ओएनजीसी’ आणि ‘गेल’च्या अज्ञात अधिकाऱ्यांना सुमारे १०० कोटींची लाच दिल्याचा रोल्स राॅइसवर आरोप आहे.

संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या तक्रारीच्या आधारावर सीबीआयने ही कारवाई सुरु  केली आहे. संरक्षण मंत्रालयाकडेही सिंगापूरमील अशोक पटणी आणि त्यांच्या आशमोर प्रा. लि. कंपनीविरोधात तक्रार दाखल आहे. 

सीबीआयच्या म्हणण्यानुसार, २००० ते २०१३ या कालावधीत रोल्स राॅइसला एचएएलकडून ४७०० कोटींची कंत्राटे मिळाली होती. रोल्स रॉइसने पटनी यांना एव्हाॅन आणि ॲलिसन इंजिनचे सुटे भाग ‘एचएएल’ला पुरविण्याकरीता सल्लागार म्हणून पटणी यांना १८ कोटी रुपये दिले होते. सीबीआयच्या तक्रारीत भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या रोल्स राॅइस आणि एचएएल, ओएनजीसी आणि गेलच्या अज्ञात अधिकाऱ्यांचा उल्लेख आहे. 

गेलकडूनही रोल्स राॅइसला अनेक कंत्राटे देण्यात आली होती. याप्रकरणात पाच वर्षे चौकशी चालल्यानंतर सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. 

प्रकरण काय? 
२००३ ते २०१३ या दहा वर्षाच्या काळात एचएएल आणि रोल्स राॅइस यांच्यातील व्यवहाराची रक्कम सुमारे ४,७०० कोटी असल्याचे सीबीआयचे म्हणणे आहे. २००७ ते २०११ या काळात ॲव्हॉन आणि अलिसन इंजिन्सचे सुट्या भागांच्या पुरवठ्यासाठी व्यावसायिक सल्लागार म्हणून अशोक पटणी यांना १८ कोटी रुपयांची लाच दिल्याचे सीबीआयने म्हटले आहे. 

ओएनजीसी आणि गेल यांच्यासमवेत करारात एजंटची सेवा मान्य असली तरी एजंटचे नाव जाहीर करणे बंधनकारक आहे. मात्र, रोल्स राॅइसने नियम आणि अटीचा भंग करत नाव जाहीर न केल्याचा आरोप सीबीआयने केला आहे. शेवटी रोल्स राॅइसने २०१३ मध्ये एजंटचे नाव घोषित केले. तसेच २००७ ते २०११ या काळात ओएनजीसीला सुट्या भागांचा पुरवठा करण्याच्या ७३ खरेदी ऑर्डर मिळविण्यासाठी रोल्स राॅइसने २९.८१ कोटी रुपये लाच म्हणून दिले. मात्र, या बाबतची माहिती अन्य कंपन्यांपासून लपविली आणि अखेर ही बाब २०१३ मध्ये उघड केल्याचा ठपका सीबीआयने ठेवला आहे. २००७ ते २०१० या काळात गेल कंपनीकडून कंत्राट मिळविण्यासाठीही दहा लाख ब्रिटिश पौंड लाच दिल्याचे सीबीआयचे  म्हणणे आहे. 

रोल्स राॅइसने पटणीची अन्य कंपनी टर्बोटेक एनर्जी सर्व्हिसेस इंटरनॅशनल प्रा. लिमिटेडशी करार केला आणि त्यास अतिरिक्त दलाली देण्यात आली; पण ही बाब गेल कंपनीपासून लपवून ठेवण्यात आली. २००७ ते २०१० या काळात गेलला वस्तू पुरवठा करण्यासाठी दलालीपोटी रोल्स राॅइसने २८.९ कोटी रुपये दिल्याचे सीबीआयने तपासात म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rolls Rice offense in bribery case