सोनू निगमचे केस कापून, धिंड काढणाऱ्यास 10 लाखाचे बक्षीस

वृत्तसंस्था
बुधवार, 19 एप्रिल 2017

रोज पहाटे अजानच्या आवाजामुळे त्रस्त झाल्याने गायक सोनू निगम याने ट्विटरद्वारे उद्‌वेग व्यक्त केला होता. त्यामुळे नाराज झालेल्या पश्‍चिम बंगालमधील एका अल्पसंख्यांक समुदायाच्या नेत्याने सोनू निगमचे केस कापून त्याची धिंड काढणाऱ्यास दहा लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

नवी दिल्ली - रोज पहाटे अजानच्या आवाजामुळे त्रस्त झाल्याने गायक सोनू निगम याने ट्विटरद्वारे उद्‌वेग व्यक्त केला होता. त्यामुळे नाराज झालेल्या पश्‍चिम बंगालमधील एका अल्पसंख्यांक समुदायाच्या नेत्याने सोनू निगमचे केस कापून त्याची धिंड काढणाऱ्यास दहा लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

पश्‍चिम बंगाल अल्पसंख्यांक युनायटेड परिषदेचे नेते सय्यद शा अतेफ अली अल कुदेरी यांनी हे बक्षीस जाहीर केले आहे. 'जर कोणी त्याचे (सोनू निगम) केस कापले, त्याच्या गळ्यात जुन्या बूटांचा हार घातला आणि अशा अवस्थेत त्याला संपूर्ण देशात फिरवले तर मी त्याला दहा लाख रुपयांचे बक्षीस देईल', असे वक्तव्य सय्यद यांनी केले आहे. पत्रकारपरिषदेत बोलताना सय्यद यांनी सोनू निगम देशद्रोही असल्याचे सांगितले. ते म्हणाले, 'जर कोणी मंदिरात वाजविण्यात येणाऱ्या घंटेबद्दल असे वक्तव्य केले तरीही मी अशीच प्रतिक्रिया दिली असती. जर आपण परस्परांच्या धर्माबद्दल असहिष्णू राहिलो, तर एक दिवस नास्तिकांचा मोठा समूह देशात तयार होईल. निगम यांच्यासारख्या लोकांना देशाबाहेर काढले पाहिजे.'

सय्यद यांच्या प्रतिक्रियेला सोनू निगमने ट्‌विटरद्वारे उत्तर दिले आहे. 'आज दुपारी दोन वाजता त्यांनी माझ्या घरी यावे आणि माझे केस कापावेत. त्यांनी दहा लाख रुपये तयार ठेवावेत', अशा प्रतिक्रिया निगमने दिल्या आहेत. यापूर्वी 'देव सगळ्यांना सुखी ठेवो. मी मुस्लिम नसूनही मला रोज पहाटे अजानच्या आवाजामुळे उठावे लागते. भारतात धर्म लादणे कधी थांबणार आहे?', असा प्रश्न सोनूने ट्विटरद्वारे उपस्थित केला होता.

Web Title: Rs 10 lakh to shave Sonu Nigam's head: West Bengal maulvi issues fatwa