टपाल कार्यालयांत 32,631 कोटी जमा

वृत्तसंस्था
सोमवार, 28 नोव्हेंबर 2016

नोटाबंदीचा परिणाम; पाचशे व हजाराच्या 43.48 कोटी जुन्या नोटा

नवी दिल्ली - पाचशे व हजारच्या जुन्या नोटा सरकारकडून बंद झाल्यानंतर देशभरातील 1.55 लाख टपाल कार्यालयांमध्ये 32 हजार 631 कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जमा झाल्या आहेत.

नोटाबंदीचा परिणाम; पाचशे व हजाराच्या 43.48 कोटी जुन्या नोटा

नवी दिल्ली - पाचशे व हजारच्या जुन्या नोटा सरकारकडून बंद झाल्यानंतर देशभरातील 1.55 लाख टपाल कार्यालयांमध्ये 32 हजार 631 कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जमा झाल्या आहेत.

टपाल कार्यालयांनी 10 ते 24 नोव्हेंबरदरम्यान 3 हजार 680 कोटी रुपयांच्या जुन्या नोटा बदलून दिल्या आहेत. याविषयी माहिती देताना टपाल विभागाचे सचिव बी. व्ही. सुधाकर म्हणाले, ""टपाल कार्यालयांमध्ये 10 ते 24 नोव्हेंबर या कालावधीत 578 लाख जुन्या नोटा म्हणजेच 3 हजार 680 कोटी रुपयांच्या नोटा बदलून देण्यात आल्या आहेत. याच काळात टपाल कार्यालयांमध्ये 43.48 कोटी जुन्या नोटा म्हणजेच 32 हजार 631 कोटी रुपये जमा झाले आहेत. या कालावधीत टपाल कार्यालयांतून 3 हजार 583 कोटी रुपये काढण्यात आले आहेत. देशभरात 1.55 लाख टपाल कार्यालये असून, यातील ग्रामीण भागात 1.30 लाख, तर शहरी आणि निमशहरी भागात 25 हजार टपाल कार्यालये आहेत.''
पाचशे व हजाराच्या नोटा बंद केल्यानंतर त्या बॅंका आणि टपाल कार्यालयांत जमा करण्याची अथवा बदलण्याची सवलत देण्यात आली होती. यानंतर बॅंका आणि एटीएमबाहेर मोठ्या रांगा लागल्या. बॅंका आणि टपाल कार्यालयांतील जुन्या नोटा बदलण्याची मुदत 24 नोव्हेंबरला संपली आहे. आता जुन्या नोटा 30 डिसेंबरपर्यंत केवळ बॅंकांतच जमा करता येतील.

Web Title: Rs. 32631 crore cash collected in Post Office