अण्णांच्या आंदोलनाला संघाची फूस : हार्दिक पटेल 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 26 मार्च 2018

अण्णांनी दिल्लीवाल्यांच्या इशाऱ्यावरच आपल्याला भेटीपासून रोखले. त्यांनी पंतप्रधानांना 43 पत्रे लिहिली. मात्र, इतका वेळ कशाला थांबले? 5 पत्रे लिहिल्यावर लगेच आंदोलनाला का बसले नाहीत? 
- हार्दिक पटेल, पाटीदार नेता 
 

नवी दिल्ली : रामलीला मैदानावर उपोषणाला बसलेले समाजसेवक अण्णा हजारे यांनी मंचावर येण्यास मज्जाव केल्याने डिवचलेला पाटीदार नेता हार्दिक पटेल याने या आंदोलनामागे संघाची फूस असल्याचा खळबळजनक आरोप आज केला. याबाबत अण्णांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले, हार्दिक पटेल यांचा मेसेज आला तेव्हा मी त्यांना "तुम्ही मंचावर बसू शकणार नाही आणि भाषण करायला मिळणार नाही,'' असा संदेश पाठविला. 

हार्दिक पटेल गेल्या आठवड्यात व आजही दिल्लीत आले होते. त्यांनी अण्णांच्या भेटीसाठी निरोप पाठविला. अण्णांनी त्यांना भेट नाकारली नाही; मात्र अटी घातल्या. ते म्हणाले, हार्दिक पटेल यांनी यापूर्वी काही राजकीय लोकांशी संबंध ठेवले होते. या आंदोलनात सरकारचे अधिकृत प्रतिनिधी वगळता राजकीय लोक नकोच आहेत. त्यामुळे मी त्यांना भेटू शकता, पण व्यासपीठावर यायचे नाही व भाषण करायला मिळणार नाही, असे सांगितले. त्यानंतर हार्दिक यांनी अण्णांच्या आंदोलनावर टीकेची झोड उठविताना संघालाही यात ओढले.

ते म्हणाले की, शेतकऱ्यांनी हे आंदोलन स्वतःच्या हातात घेतल्याने सरकार अस्वस्थ आहे. हा आक्रोश शांत करण्यासाठी हे आंदोलन संघाने हातात घेण्याचा प्रयत्न चालविला आहे. आमची आरक्षणाची मागणी चुकीची आहे, असे अण्णांना वाटत असेल तर आंबेडकरांची घटना मोठी की अण्णा? अण्णा व आंबेडकर यांची तुलना होत असेल तर "आय हेट अण्णा' असेही टीकास्त्र हार्दिकने सोडले. ते म्हणाले की, अण्णा आमच्यासारख्या आंदोलकांना दूर का ठेवत आहेत. मागच्या आंदोलनात विरोधी पक्ष नव्हते का? मग यावेळीच त्यांनी इतकी टोकाची भूमिका का घेतली. अण्णांच्या मुद्यांना विरोधी पक्षांची साथ मिळत असेल तर त्यांना त्यांची इतकी ऍलर्जी का आहे? 

अण्णांनी दिल्लीवाल्यांच्या इशाऱ्यावरच आपल्याला भेटीपासून रोखले. त्यांनी पंतप्रधानांना 43 पत्रे लिहिली. मात्र, इतका वेळ कशाला थांबले? 5 पत्रे लिहिल्यावर लगेच आंदोलनाला का बसले नाहीत? 
- हार्दिक पटेल, पाटीदार नेता 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: RSS behind Anna Hazare agitation says Hardik Patel