शिवरायांचे हिंदवी स्वराज्य आदर्शवत- संघनेते इंद्रेशकुमार

वृत्तसंस्था
सोमवार, 3 डिसेंबर 2018

"ज्या राज्याच्या प्रमुखांचा विचार जातीपातीविरहित, शासन-प्रशासनाच्या आदर्श मूल्यांवर आधारित असतो, त्यांचे राज्यही तसेच आदर्शवत होते. पुढची हजारो वर्षे ते देशासाठी मार्गदर्शक ठरते. याचे सर्वोत्कृष्ट उदाहरण म्हणजे छत्रपती शिवरायांचे हिंदवी स्वराज्य होय,' असे गौरवोद्गार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते व मुस्लिम राष्ट्रीय मंचाचे प्रमुख इंद्रेशकुमार यांनी नुकतेच काढले.

नवी दिल्ली- "ज्या राज्याच्या प्रमुखांचा विचार जातीपातीविरहित, शासन-प्रशासनाच्या आदर्श मूल्यांवर आधारित असतो, त्यांचे राज्यही तसेच आदर्शवत होते. पुढची हजारो वर्षे ते देशासाठी मार्गदर्शक ठरते. याचे सर्वोत्कृष्ट उदाहरण म्हणजे छत्रपती शिवरायांचे हिंदवी स्वराज्य होय,' असे गौरवोद्गार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते व मुस्लिम राष्ट्रीय मंचाचे प्रमुख इंद्रेशकुमार यांनी नुकतेच काढले.

छत्रपती शिवरायांनी 1666 मध्ये औरंगजेबाच्या तावडीतून युक्तीने स्वतःची मुक्तता करवून घेतली होती. आग्रा येथील कैदेतून महाराज व संभाजीराजे सुखरूप महाराष्ट्राकडे रवाना झाले होते. त्या ऐतिहासिक घटनेला नुकतीच 351 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त उत्तर हिंदुस्तान कृतज्ञता मैत्री अभियान संस्थेतर्फे महाराष्ट्र सदनात झालेल्या कार्यक्रमात इंद्रेशकुमार बोलत होते. छत्रपती शिवरायांना आग्र्यातील कैदेतून सुखरूप सुटका होण्यासाठी स्थानिक उत्तर भारतीयांनीही सहकार्य केले होते, याचा संदर्भ खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी या वेळी दिला. केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, रामदास आठवले, खासदार राहुल शेवाळे आदीही कार्यक्रमाला उपस्थित होते.

इंद्रेशकुमार म्हणाले की, शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्य म्हणजे धार्मिक अर्थाने नव्हते. कोणत्याही धर्माशी सापत्नभावाने न वागता राष्ट्र आणि मानवी चिंतनाच्या दृष्टिकोनातून महाराजांनी राज्यकारभार केला म्हणून तो पुढील पिढ्यांसाठी आदर्शवत ठरला. केवळ जातीपातीविरहित राज्यकारभारच त्यांनी केला नाही, तर कोणत्याही धर्माच्या लोकांवरही स्वराज्यात अन्याय झाल्याचे दिसून येत नाही. महाराजांनी धर्माच्या व पंथांच्या आधारावर कोणाशीही भेदभाव केला नाही. आपल्याला सय्यद बंडा याच्यासारखी काही नावेच माहिती असली तरी महाराजांच्या सैन्यात अनेक मुस्लिम सेनापतींनी शौर्य गाजविले होते. महाराजांच्या नौदलात तर अनेक मुसलमान सेनापती वरिष्ठ पदांवर होते. महिलांशी सन्मानाने वागणारा राजा हे शिवरायांचे आणखी एक वेगळेपण होते, असे सांगून ते म्हणाले की, महाराजांनी महिलांना कायम मातृस्वरूप मानले. राज्यकर्त्याने महिलांबरोबर कसे वागावे, याचा वस्तुपाठ शिवरायांनी घालून दिलेला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: RSS leadar Indresh Kumar speak about Shivaji Maharaj