
'असं' झालं तर एक दिवस भगवाच आपला राष्ट्रध्वज असेल: RSS नेता
बंगळुरू : आरएसएस नेत्याने राष्ट्रध्वजावरून वक्तव्य करत एका नव्या वादाला तोंड फोडले आहे. ''एक ना एक दिवस भगवा ध्वज हाच आपला राष्ट्रध्वज असेल'', असं वक्तव्य कर्नाटक आरएसएसचे नेते प्रभाकर भट (RSS Leader Prabhakar Bhat) यांनी केलं आहे. ते विश्व हिंदू परिषदेच्या पदयात्रा कार्यक्रमाच्या समारोपाप्रसंगी बोलत होते.
हेही वाचा: Ukraine Russia War थांबविण्यासाठी PM मोदींनी स्वतःची ओळख वापरली : ऑस्ट्रेलिया
''काँग्रेसच्या धोरणांमुळे भारताचा झेंडा मोडला गेला. हा तिरंगा कोणी बनवला? यापूर्वी कोणता ध्वज होता? पूर्वी ब्रिटिशांचा युनियन जॅक होता. त्यापूर्वी आपल्या देशाच्या ध्वजात हिरवा तारा आणि चंद्र होता'', असे आरएसएसचे प्रभाकर भट म्हणाले. ते इतक्यावरच थांबले नाहीतर त्यांनी राष्ट्रध्वज तिरंगा बदलायला पाहिजे, असं वक्तव्य केलं. ''संसदेत बहुसंख्य लोकांनी राष्ट्रध्वज बदलण्याच्या बाजूने मतदान केले तर राष्ट्रध्वज नक्कीच बदलू शकतो. संसदेत बहुमत मिळालं की एक ना एक दिवस भगवाच आपला राष्ट्रध्वज असेल. भगवा राष्ट्रध्वज झाला तर हिंदू समाज संघटीत होईल'', असंही प्रभाकर भट म्हणाले.
गुजरात सरकारने शालेय अभ्यासक्रमात भगवद् गीतेचा समावेश केला आहे. तसेच कर्नाटक सरकार देखील मूल्यशिक्षणात भगवद् गीता शिकविण्याचा विचार करत आहे. त्याबाबत बोलताना भट म्हणाले, ''यापूर्वी स्वर्णवल्ली श्रींनी सांगितले होते की, ते शाळेत भगवद् गीता शिकवतील. तेव्हा सर्व पुरोगामी विचारवंतांनी अराजकता माजवली होती. बायबल आणि कुराण तुमच्या घरी असू द्या. भगवद् गीता सर्व शाळांमध्ये आणि घरांमध्ये वाचली गेली पाहिजे.''
''एखाद्याला या जगात नीट जगायचे असेल तर त्याने भगवद् गीता वाचली पाहिजे. आमच्या कर्नाटक सरकारने गुजरात सरकारप्रमाणे शाळांमध्ये भगवद् गीता शिकवण्याचे धाडसी पाऊल उचलले आहे. आम्ही सर्वजण या निर्णयाचे समर्थन करतो'', असंही आरएसएस नेते म्हणाले.
Web Title: Rss Leader Prabhakar Bhat Controversial Statement About Tricolor
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..