शबरीमलाचे दरवाजे उघडले

शबरीमलाचे दरवाजे उघडले

निलाक्कल : शबरीमला येथे भगवान अयप्पाचे मंदिर सोमवारी पाच तासांसाठी उघडण्यात आले. या पार्श्‍वभूमीवर शबरीमला येथे पन्नासहून अधिक महिला सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. हे मंदिर रात्री दहापर्यंत सुरू राहिले. यादरम्यान सुरक्षाव्यवस्थेची संपूर्ण तयारी केली असून, मोठ्या संख्येने पोलिस कर्मचारी परिसरात तैनात करण्यात आल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. 

तत्पूर्वी रविवारी सकाळीच एरुमेली येथे पोचलेल्या भाविकांनी पम्बा आणि सन्निधानममध्ये प्रवेश नाकारल्याच्या निषेधार्थ सोमवारी सकाळी आंदोलन केले. यामुळे वाहतूकसेवा काही काळ विस्कळीत झाली. एका संतप्त भाविकाने म्हटले, की आम्ही कालच्या सायंकाळपासून सोडण्याची वाट पाहत आहोत. सकाळी सहा वाजता सोडले जाईल, असे आम्हाला सांगण्यात आले. आम्ही अयप्पा यांची पूजा करण्यासाठी आलो असून, दर्शनासाठी सोडावे, अशी विनंती त्याने केली. जर खासगी वाहनांना परवानगी दिली जात नसेल, तर केरळ परिवहन महामंडळाच्या बसमधून पम्बा येथे न्यावे, असेही त्यांनी म्हटले आहे. सोमवारी सकाळी नऊपर्यंत येथील शिबिरातून पम्बा आणि सन्निधानमपर्यंत जाण्यास परवानगी नाकारली होती. 

'पुजाऱ्यांनी माझा सल्ला घेतला होता' 
तिरुअनंतपुरम : महिलांना मंदिरात प्रवेश दिल्यास मंदिर बंद करण्याचा इशारा देण्यापूर्वी शबरीमला मंदिराच्या प्रमुख पुजाऱ्यांनी माझ्याशी चर्चा केली होती, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी म्हटल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.

भाजप युवा मोर्चाच्या एका कार्यक्रमात पिल्लई यांनी हे विधान केल्याचा व्हिडिओ एका वाहिनीने प्रसिद्ध केला आहे. त्यांच्या या विधानानंतर माकप आणि कॉंग्रेसने तीव्र टीका केली आहे. पिल्लई हे उच्च न्यायालयात वकील म्हणून काम करतात. आपल्याकडे अनेक जण सल्ला मागण्यासाठी येतात, तसाच सल्ला मंदिरप्रमुखांनीही मागितला होता, असे ते म्हणाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com