फडणविसांच्या प्रतिस्पर्ध्यांची गत पाचशेच्या नोटेसारखी

फडणविसांच्या प्रतिस्पर्ध्यांची गत पाचशेच्या नोटेसारखी
फडणविसांच्या प्रतिस्पर्ध्यांची गत पाचशेच्या नोटेसारखी

नगरपालिका व नगरपरिषद निवडणुकीत भाजपला मिळालेल्या प्रचंड यशाच्या श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून अगदी साध्या कार्यकर्त्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात येत आहे. वर्ध्यापासून सावंतवाडीपर्यंत भाजपला मिळालेल्या यशाबद्दल मुख्यमंत्र्यांचा उदोउदो होत असताना महाराष्ट्रातून त्यांना टक्कर देतील असे पक्षातीलच नेते दिवसेंदिवस हतबल होताना दिसत आहेत. मुख्यमंत्र्यांची पत वाढत असताना पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी नेत्यांची 'शिस्तबद्ध'पद्धतीने कोंडी होत आहे, हे नक्की.

विधानसभेत एकहाती सत्ता मिळविण्यात अपयशी ठरलेल्या भाजपला गावपातळीवर ठसा उमटविण्यात यश आले आहे. त्यासाठी स्थानिक पक्षाशी युती म्हणा की त्याभागातील वजनदार नेत्याला पक्षात सहभागी करून घेत म्हणा पण भाजपने सर्व मार्ग वापरून सर्वाधिक जागा नगरपालिकांमध्ये मिळविल्या. भाजपने नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या या निवडणुकीत 893 जागी नगरसेवक निवडून आणत सत्तेत नाईलाजास्तव सहभागी असलेल्या शिवसेनेला शह दिला. शिवसेना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्याही मागे चौथ्या स्थानावर राहिली आहे. भाजपच्या यशामध्ये प्रामुख्याने उल्लेख करता येईल तो मुख्यमंत्र्यांनी लावलेल्या सभांच्या धडाक्यांचा आणि याचा थेट फायदा मुख्यमंत्र्यांना विरोधकांना आणखी कुमकुवत करण्यासाठी नक्की झालायं हे सत्य आहे.

खडसेंपाठोपाठ मुंडे, दानवे
भोसरीतील कथित जमीन वाटप प्रकरण, अंडरवर्ल्ड डॉन दाऊन इब्राहिमशी कथित संभाषण अशा धडाधड झालेल्या आरोपांमुळे मुख्यमंत्रिपदापासून दुर राहिलेल्या एकनाथ खडसेंना वर्षभरानंतच मंत्रिपदालाही रामराम करावा लागला. खडसे चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले असतानाच मी मुख्यमंत्रीपदाच्या दावेदार असल्याचे सांगणाऱ्या पंकजा मुंडे यांना भगवानगडावरूनच होणार विरोध आणि त्यापाठोपाठ परळीत स्वीकारावा लागलेला पराभव पाहता त्यांचा मुख्यमंत्रीपदावरील दावा फोल ठरतो आहे. बालेकिल्ल्यातच जनमत गमाविलेल्या पंकजांना आपली दावेदारी मजबूत करण्यात यापुढे कमालीची अडचण होणार आहे. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याबाबतही असेच घडले आहे. केंद्रात मंत्री असताना त्यांना प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली अन् त्यांच्याकडे पक्षातील मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून पाहिले जाऊ लागले. दानवे यांना भोकरदनमधील निकालांनंतर फडणवीस यांना पेढा भरविल्याशिवाय पर्याय उरला नाही. विधान परिषदेतही फडणवीस यांनी आपल्या समर्थक आमदारांना जळगाव आणि भंडारामध्ये निवडून आणत स्वतःची ताकद आणखी वाढविली आहे.

देशभक्ती आणि विश्वास
पंतप्रधान मोदींनी पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर रत्नागिरीत झालेल्या सभेत मुख्यमंत्र्यांनी या निर्णयाला देशभक्तीचे रुप देत नागरिकांना भावनिक आवाहन केले. देश आर्थिक स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर असून, बँका व एटीएमबाहेर थांबून देशभक्ती दाखवा असे सांगितल्याने हा मुद्दा देशपातळीवरही गाजला. मोदींनी खुर्चीवर बसविलेल्या फडणवीसांनी मोदींचा विश्वास जिंकण्याची एकही संधी गमाविलेली नाही. याचे ताजे उदाहरण म्हणजे नगरपालिकांत मिळविलेला विजय हा पंतप्रधानांनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाला नागरिकांचे समर्थन असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी पक्षातील आपल्या प्रतिस्पर्ध्यांना आणखी मागे टाकले आहे.

पक्षातील प्रतिस्पर्ध्यांना दोन वर्षांतच शांत करण्यात यशस्वी झालेल्या फडणवीस यांना आता महानगरपालिका निवडणुकांच्या कसोटीला सामोरे जावे लागणार आहे. यासाठी त्यांनी आतापासूनच मोर्चेबांधणीस सुरवात केली असून, स्थानिक शक्तींना पक्षाकडे वळविण्यास सुरवात केली आहे. जनसुराज्य पक्ष, भोसरीचे आमदार महेश लांडगे याची ताजी उदाहरणे म्हणता येतील. आता फडणवीसांना पक्षातील आपले स्थान आणखी बळकट करण्यासाठी आणि केंद्राचा आपल्यावरील विश्वास आणखी दृढ करण्याची नामी संधी आहे. राज ठाकरे जरी म्हणत असले हा भाजपने मिळविलेला विजय जुन्या नोटांचा आहे. पण, फडणवीसांना जुन्या नोटांप्रमाणे विरोधक आणि पक्ष प्रतिस्पर्ध्यांचे विरोध करण्याचे मार्ग बंद करून थेट शंभरच्या नोटेनंतर दोन हजारांच्या नोटेपर्यंत उडी मारली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com