पैशाबाबत आमचं चुकलं तरी काय?

note ban
note ban

पाचशे-हजाराच्या नोटा चलनातून रद्द होऊन आठवडा उलटून गेला आहे. निर्णय घेताना काही अंदाज बांधले असतील; काही नियोजन केले असेल. वस्तुस्थिती अंदाजापेक्षा बिकट आहे. बँका, एटीएमसमोरच्या रांगा वाढतच चालल्या आहेत. बाजारात विलक्षण मंदीचे वातावरण पसरले आहे. पै पै करून साठवलेला पैसा रात्रीत खोटा झाल्याने सामान्य माणसावर कोसळलेल्या संकटावर केलेले हे भाष्य.

पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा संपविण्याच्या प्रयत्नात नागरिक बनावट नोटा असल्यासारखी त्याची विल्हेवाट लावत आहेत. पेट्रोल पंपावर एरव्ही पन्नास, शंभर रुपये खर्चणारा नागरिक पाचशे रुपयांची नोट घालविण्यासाठी टाकी फुल्ल करत आहे. किराणा दुकानातही वेगळी परिस्थिती नाही. बिल भरण्यासाठी पाचशेच्या नोटा घेण्यास नकार दिल्याने एका महिलेला मंगळसूत्रच रुग्णालयाकडे ठेवावे लागल्याचे वृत्त आहे. काही जणांचे लग्न पुढे ढकलली गेली आहेत, तर मुंबईत बँकेबाहेर एका वधूलाच पैसे बदलण्यासाठी थांबावे लागले. मग या निर्णयाचा खरा फायदा कोणाला झाला आणि खरा तोटा कोणाला झाला हे आपणच ठरविले पाहिजे. 

भ्रष्टाचार आम्हालाही नको आहे...आम्हीलाही वाटते परदेशातील काळा पैसा परत आलाच पाहिजे...स्वीस बँकांतील त्या खातेदारांचे चेहरे देशासमोर उघड झाले पाहिजेत...देशातील एकही गरीब उपाशीपोटी झोपता कामा नये. पण, घरदार सोडून बँकांबाहेर उभे रहावे लागेल, पै ना पै करून साठवून ठेवलेला पैसा परत मिळवण्यासाठी तासन््तास बँकांचे उंबरे झिजवावे लागतील अन् सुट्टे पैसे करण्यासाठी खर्च करावा लागणार असेल तर आमचं काय चुकलं हा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठ नोव्हेंबरला सायंकाळी आठ वाजता चलनातून पाचशे आणि हजारच्या नोटा बंद करण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला. केंद्रात एकहाती सत्ता असलेल्या मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारचा हा निर्णय काळा पैसा बाहेर येण्यासाठी, पाकिस्तानसारख्या दुर्दैवीरित्या लाभलेल्या शेजारील देशातून येणाऱ्या बनावट नोटांसाठी आणि भ्रष्टाचाराला आळा बसण्यासाठी नक्कीच कौतुकास्पद आहे. या निर्णयाचे स्वागत करावे तेवढे थोडेच आहे. झोपडीत राहणाऱ्या नागरिकापासून मोठ्या बंगल्यातील नागरिकांपर्यंत पाचशे आणि हजार नोटा बाळगणाऱ्यावर थेट परिणाम करणारा हा निर्णय होता. निर्णयाचा फटका सर्वसामान्यांना सर्वाधिक बसणार याची माहिती असूनही, धनाढ्यांनी लपविलेला काळा पैसा बाहेर येणार याची खात्री बाळगत मोदींनी हा धाडसी निर्णय घेतला.

आता या निर्णयावरून देशभर गोंधळाची स्थिती आहे. नागरिक हातातील कामे सो़डून पैसे भरण्यासाठी किंवा पैसे काढण्यासाठी बँकांबाहेर उभे आहेत. कोणी मुलांच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी, घरासाठी तर कोणी आजारपणासाठी जोडून ठेवलेला स्वतःचाच पैसा पाहिजे त्या वेळी उपलब्ध होत नसल्याने अस्वस्थ आहे. नोटा बदलून घेण्यासाठी अक्षरशः झुंबड उडाली आङे. एटीएमबाहेर दिवस-रात्र लांबच लांब रांगा आहेत. बँकांबाहेरच्या रांगांमध्येच काहींचा जीव गेला आहे. ही परिस्थिती नियंत्रणात येण्यासाठी आणखी किती दिवस लागतील याची नेमकी माहिती कुणाकडेच नाही. सर्व आटोक्यात येईल, तेव्हा या निर्णयावरील रोष किती झाला असेल याचा अंदाज आताच लावणे कठीण आहे.

दोन हजारांच्या नोटा कशासाठी

पाचशे आणि हजारांच्या नोटांमुळे लोकांकडे एकगठ्ठा पैसा साठू लागला आणि त्यातून काळा पैसा लपविण्याचे प्रमाण वाढले हे आपण मान्य केले. पण, आता सरकारने चक्क दोन हजारांची नोट बाजारात आणली आहे. शंभरनंतर सध्या थेट दोन हजार रुपयांची नोट सध्या नागरिकांच्या हातात आहे. या नोटा सुरु करण्यामागील कारणे अद्यापही नागरिकांनी उमजलेली नाहीत. सोशल मीडियावर फिरणारे भुरट्या माहितीचे मेसेज अकारण देशभक्तीचे गोडवे गात दोन हजाराच्या नोटांचे समर्थन करीत आहेत. त्या मेसेजना बाजूला ठेवू. सामान्य कुटुंबाचा विचार करू. बाजारात खरेदीसाठी गेलेल्या गृहिणींना पाचशे रुपय सुट्टे करताना नाकीनऊ येते. आता दोन हजार रुपये घेऊन भाजीपाल्यासाठी फिरावे लागत आहे. भ्रष्टाचाराच्या बाबतीतच विचार केला तर, दोन हजार रुपयांच्या नोटांवरून काळा पैसा आणि भ्रष्टाचार आणखी बोकाळेल याची हमी आता कोणीच देऊ शकत नाही. मायक्रो चीप बसविण्यात आली आहे, नोट पुरुन ठेवली तर कळेल अशा अनेक वावड्यां नोट प्रत्यक्ष हातात आल्यावर फोल ठरतात. कर्नाटकमध्ये तर एकाने या नोटेची कलर झेरॉक्स काढून फसवणूक केल्याची घटना घडली. दोन हजार ही रक्कम खूप मोठी असून, गरिबांच्या वाट्याला ती येण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे दोन हजारांची नोट चलनात आणण्याचा निर्णय अनाकलनीय आहे.

बँकांबाहेर रांगेत उभे राहून देशकार्याला मदत करणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांना मला एवढेच सांगायचे आहे, की माझ्याकडे साठविलेल्या पैशावर आता माझाच हक्क राहिला नाही. ज्या बँकांनी नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पुरेशी काळजी घ्यायला हवी होती, तेथेच दोन-चार हजार रुपयांसाठी कामधाम सोडून तासनतास थांबावे लागत आहे. एटीएम मशिनचे नोटांसाठी आवश्यक स्लॉट बनविण्यापासूनची तयारी अजून सुरूच आहे. क्रांतिकारी निर्णय घेऊन आठवडा ओलांडला तरी देश रस्त्यांवर, बँकांबाहेर उभा आहे, त्यामुळे साहजिकच प्रश्न उभा राहतो आमचं काय चुकलं?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com