सचिनकडून राज्यसभेचे सर्व वेतन पंतप्रधान मदतनिधीला

वृत्तसंस्था
सोमवार, 2 एप्रिल 2018

गेल्या सहा वर्षांमध्ये सचिन यांना नव्वद लाख रुपये वेतन आणि इतर काही भत्ते मिळाले आहेत. सचिन तेंडुलकर यांचा खासदारकीचा कार्यकाळ नुकताच संपुष्टात आला आहे. 2012 मध्ये राज्यसभेवर नियुक्ती झाल्यापासून त्यांनी केवळ 7.3 टक्के उपस्थिती दर्शविली आहे.

नवी दिल्ली : क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी त्यांना राज्यसभा खासदार म्हणून आतापर्यंत मिळालेले सर्व वेतन आणि भत्ते पंतप्रधान मदतनिधीला देणगी म्हणून दिले आहेत.

गेल्या सहा वर्षांमध्ये सचिन यांना नव्वद लाख रुपये वेतन आणि इतर काही भत्ते मिळाले आहेत. सचिन तेंडुलकर यांचा खासदारकीचा कार्यकाळ नुकताच संपुष्टात आला आहे. 2012 मध्ये राज्यसभेवर नियुक्ती झाल्यापासून त्यांनी केवळ 7.3 टक्के उपस्थिती दर्शविली आहे. मात्र, आपल्या खासदारनिधीचा वापर त्यांनी योग्यरीतीने केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

सचिन यांच्या कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, सचिन यांनी खासदार म्हणून 185 प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. यातील बहुतेक प्रकल्प शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित आहेत. तेंडुलकर यांनी सांसद आदर्श ग्राम योजनेअंतर्गत दोन गावेही दत्तक घेतली आहेत. त्यांनी दिलेल्या देणगीबद्दल पंतप्रधान कार्यालयाने कौतुक केले असून, त्यांच्या या औदार्याचा फायदा गरजू व्यक्तींना होईल, असे म्हटले आहे.

Web Title: Sachin Tendulkar donates entire Rajya Sabha salary to PM Relief Fund after finishing term as MP