सोन्याच्या विटा बाळगणाऱ्या साध्वीला गुजरातेत अटक

वृत्तसंस्था
शुक्रवार, 27 जानेवारी 2017

बानसकंथा (गुजरात) : सोन्याच्या विटा विकत घेऊन त्याचे पैसे न दिल्याप्रकरणी गुजरातच्या उत्तर भागातून पोलिसांनी एका साध्वीला अटक केली आहे. साध्वी जय श्री गिरी असे तिचे नाव असून, नोव्हेंबर महिन्यामध्ये तिने पाच कोटी रुपयांच्या सोन्याच्या विटा खरेदी केल्या होत्या.

बानसकंथा जिल्ह्यामधील एका विश्‍वस्त संस्थेची साध्वी जय श्री गिरी ही अध्यक्ष असून, या संस्थेतर्फे एका मंदिराची व्यवस्था पाहिली जाते. तिने मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात पाच कोटी रुपयांच्या सोन्याच्या विटा विकत घेऊन त्याचे पैसे सराफाला दिले नव्हते. गेल्या साडेतीन महिन्यांमध्ये वारंवार आठवण करूनसुद्धा त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. त्यामुळे संबंधित सराफाने पोलिसांकडे तक्रार नोंदविली. या आधारावर पोलिसांनी साध्वीच्या घराची तपासणी केली असता, 80 लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या 24 विटा आणि एक कोटी 29 लाख रुपयांची रोख रक्कम तेथे आढळली. ही सर्व रोख रक्कम दोन हजार रुपयांच्या नोटांच्या स्वरूपात होती. विशेष म्हणजे, या साध्वीच्या घरी मद्याच्याही बाटल्या आढळल्याचे सूत्रांनी सांगितले. याप्रकरणी साध्वीसह तिघांना अटक केली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये एका सार्वजनिक संगीत कार्यक्रमामध्ये ही साध्वी दोन हजार रुपयांच्या नोटा गायकांवर उधळत असल्याचा व्हिडिओ प्रसिद्ध झाल्याने वाद निर्माण झाला होता. नोटाबंदीमुळे नागरिकांना पैशांची चणचण भासत असताना या साध्वीने सुमारे एक कोटी रुपये उधळल्याचा काहींचा दावा आहे.

Web Title: Sadhvi, who was arrested in Gujarat gold bars