सहारनपूरमध्ये मोबाईल इंटरनेटवर बंदी

वृत्तसंस्था
गुरुवार, 25 मे 2017

सहारनपूरमधील शब्बीरपूर गावात पाच मे रोजी दलित आणि ठाकूर यांच्यात संघर्ष झाला होता, त्यात एकाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर नऊ मे रोजी दलित आणि पोलिसांमध्ये नऊ ठिकाणी संघर्ष झाला होता.

सहारनपूर - सहारनपूरमध्ये उफाळलेला जातीय हिंसाचार रोखण्यात अपयश आल्याने राज्य सरकारने जिल्हाधिकारी एन. पी. सिंह, पोलिस अधीक्षक एम. सी. दुबे, उपजिल्हाधिकारी आणि मुख्याधिकाऱ्यांना पदावरून हटविले असून, मोबाईल इंटरनेट, सोशल मिडीयावर बंदी आणली आहे. 

सहारनपूरचे प्रमोदकुमार पांडे हे आता नवे जिल्हाधिकारी असतील, तर बबलू कुमार हे नवे पोलिस अधीक्षक असतील. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणात पोलिस महासंचालकांनाही फटकारले आहे. दरम्यान, जनकपुरीत एकास, तर बडगावात दोघांना आज गोळ्या घालून ठार मारण्यात आले. हिंसाचाराच्या घटनेनंतर परिसरात तणावपूर्ण परिस्थिती आहे. परिसरात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. याप्रकरणी आतापर्यंत 24 जणांना अटक करण्यात आली आहे. 

हिंसा पसरवण्यासाठी सोशल मिडीयाचा वापर होत असल्याने इंटरनेटवर बंदी आणण्यात आली आहे. हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्या तरुणांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारने 15 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. तर, सर्व जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे. 

सहारनपूरमधील शब्बीरपूर गावात पाच मे रोजी दलित आणि ठाकूर यांच्यात संघर्ष झाला होता, त्यात एकाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर नऊ मे रोजी दलित आणि पोलिसांमध्ये नऊ ठिकाणी संघर्ष झाला होता. या घटनांच्या निषेधार्थ 21 मे रोजी दिल्लीत जंतरमंतरवर निदर्शने करण्यात आली होती. बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती काल सहारनपूरच्या दौऱ्यावर होत्या. त्यांच्या दौऱ्यानंतर तेथे हिंसाचार उफाळला, त्यात एकाचा मृत्यू झाला होता. शब्बीरपूरहून परतणाऱ्या बसप कार्यकर्त्यांच्या वाहनावर जमावाने हल्ला चढवला होता. यात सहा जण जखमी झाले होते. तसेच, चंदपुरा येथेही एका गटाने काही जणांना मारहाण केली होती, तसेच गोळीबारही केला होता. या दोन्ही घटनांमधील जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

Web Title: saharanpur violence mobile internet ban