संतबाबा कुलवंतसिंघजी यांची तब्येत बिघडली ; धुपिया रामसिंग यांच्यावर तात्पुरती जबाबदारी

वृत्तसंस्था
बुधवार, 4 एप्रिल 2018

जगभरात प्रसिद्ध असलेल्या गुरुद्वारा तख्त सचखंड श्री हजूर साहेबचे मुख्य जत्थेदार संतबाबा कुलवंतसिंघजी यांची प्रकृती अचानकपणे बिघडल्यामुळे पंजप्यारे साहेबान यांनी धुपिया भाई रामसिंघजी यांना तत्काळ तख्तच्या सेवेत पाठविण्याचा निर्णय घेतला.

नांदेड : जगभरात प्रसिद्ध असलेल्या गुरुद्वारा तख्त सचखंड श्री हजूर साहेबचे मुख्य जत्थेदार संतबाबा कुलवंतसिंघजी यांची प्रकृती अचानकपणे बिघडल्यामुळे पंजप्यारे साहेबान यांनी धुपिया भाई रामसिंघजी यांना तत्काळ तख्तच्या सेवेत पाठविण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे गुरुद्वारा सचखंड बोर्डाच्या स्थानिक सदस्यांनी बैठक घेऊन समर्थन केले.

संतबाबा कुलवंतसिंघजी यांना बुधवारी (ता. चार) पहाटे साडेतीनच्या सुमारास अंगीठासाहेबच्या सेवेसाठी पोहचल्यानंतर डोकेदुखीचा त्रास होऊ लागला व अशक्तपणाही जाणवू लागला होत. पुढे बाबाजींनी प्रकृती बिघडल्याची सूचना सेवेत असलेले जमदार महेन्द्रसिंग पैदल व अन्य काही सेवकांना देऊन पंजप्यारेसाहेबान यांच्याशी चर्चा केली.

सूचना मिळताच मीत जत्थेदार संतबाबा ज्योतींदरसिंघजी, हेडग्रंथी भाई कश्मीरसिंघजी, मीत ग्रंथी भाई अवतारसिंघजी शितल, धुपिया भाई रामसिंघजी बाबाजीकडे पोहचले. बाबाजींनी प्रकृती बिघडल्याचे सांगून सेवेत अडथळा येऊ नये म्हणून धुपिया भाई रामसिंघजी यांना तात्पुरता अंगीठासाहेबच्या सेवेत पाठविण्याची सूचना केली. 

पंजप्यारेसाहेबान यांनी त्वरित बोर्डाचे अधीक्षक गुरींदरसिंघ वाधवा, ओ.एस.डी. देवेन्द्रपालसिंघ चावला, सहायक अधीक्षक ठानसिंग बुंगाई यांना बोलावून भाई रामसिंघजींना सहायक जत्थेदार म्हणून सेवेत पाठविण्याचा निर्णय करण्यात आले असल्याचे सांगितले.

सकाळी सहाच्या सुमारास शीख पंथाच्या मर्यादानुसार (परंपरा) संतबाबा कुलवंतसिंघ यांनी भाई रामसिंघजी यांची सहायक जत्थेदार म्हणून अरदास (प्रार्थना) केली. अंगीठासाहेबची परिक्रमा केल्यानंतर संतबाबा कुलवंतसिंघजी यांनी संतबाबा रामसिंघजी यांना अंगीठा साहेब (गर्भगृह) मध्ये नेले. गर्भगृहात कोणत्या पध्दतीने सेवा करायची याचे मार्गदर्शन केले. रामसिंघजी यांना सेवेते सोडून संतबाबा कुलवंतसिंघजी विश्राम करण्यासाठी निघून गेले.

दरम्यान, गुरुद्वारा बोर्डाच्या सुरक्षा विभागाने तसेच वजिराबाद पोलिस ठाण्याच्या वतीने सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारेही लक्ष ठेवण्यात येत आहे.

Web Title: Saint Kulwant Singhji Health not well Dhupiya Ramsingh