'सैराट': ती तीन महिन्यांची गरोदर होती हो...

वृत्तसंस्था
शुक्रवार, 5 जुलै 2019

आम्ही जेंव्हा दरवाजा उघडला तेव्हा दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. ते पाहून आम्हाला खूप मोठा धक्का बसला. त्यांच्या शरिरावर सगळीकडे जखमा होत्या. ती तीन महिन्यांची गरोदर होती हो...

थुथूकुडी : तमिळनाडूमध्ये 'सैराट' पुनरावृत्ती घडली असून, ऑनर किलिंगमधून दोघांना जीव गमवावा लागला आहे. आम्ही जेंव्हा दरवाजा उघडला तेव्हा दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. ते पाहून आम्हाला खूप मोठा धक्का बसला. त्यांच्या शरिरावर सगळीकडे जखमा होत्या. ती तीन महिन्यांची गरोदर होती हो, असे नातेवाईकाने सांगितले.

टी सोलईराजन (वय 23) व एस पेटछियामल ऊर्फ जोथी (वय 20) अशी हत्या झालेल्या दांपत्याची नावे आहे. जोथी तीन महिन्यांची गरोदर होती. आंतरजातीय विवाह केल्याने ही हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे. गुरुवारी (ता. 4) दोघे जेवण करून झोपल्यानंतर घराची वीज बंद करून अज्ञातांनी त्यांच्यावर हल्ला केला. यामध्ये दोघांनाही जीव गमवावा लागला आहे. याप्रकरणी पोलिसांनी जोथीच्या वडिलांना अटक केली आहे. ऑनर किलिंगमधून हे घडले असावे, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून, पुढील चौकशी करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'सोलईराजन आणि जोथी यांचे एकमेकांवर प्रेम होते. दोघेही एकाच ठिकाणी काम करत होते, त्यामुळे त्यांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, जोथीच्या कुटुंबीयांचा या विवाहाला विरोध होता. मात्र, सोलईराजनच्या कुटुंबियांचा विरोध नव्हात. जोथीने घर सोडल होते. एप्रिल महिन्यात दोघांनी विवाह केला होता. सोलईराजन याच्या कुटुंबीयांनी तक्रार दाखल केली असून, हत्येच्या संशयावरून जोथीच्या वडिलांना अटक करण्यात आली आहे.'

सोलईराजन आणि जोथी यांनी घराचा दरवाना न उघडल्यामुळे सोलईराजन याच्या आईने शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा ढकलला. त्यावेळी सोलईराजन याच्या आईला समोरचे दृश्य पाहून धक्का बसला. दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. दोघांच्या शरिरावर जखमा होत्या. सून तीन महिन्यांची गरोदर असल्यामुळे घरात आनंदाचे वातावरण होते. परंतु, हत्या झाल्यामुळे सोलईराजन कुटुंबियांना धक्का बसला आहे. सोलईराजन आणि जोथी दोघेही मिठागरात रोजंदारीवर काम करत होते. दरम्यान, एका आठवड्यातील ऑनर किलिंग ही दुसरी घटना असेल. 25 जुलै रोजी कोईम्बतूर येथे आंतररजातीय विवाह करणाऱ्या दांपत्याची हत्या करण्यात आली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sairat Inter caste couple in Tamil Nadus Thoothukudi murdered