श्रीनगरमध्ये ‘सकाळ’चा ज्ञानदीप

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 24 एप्रिल 2017

‘सकाळ रिलीफ फंडा’ने दिलेल्या आर्थिक पाठबळातून येथील गांधी मेमोरियल महाविद्यालयात तसेच गंदरबल आणि गुटलीबाग येथील माध्यमिक शाळांमध्ये अद्ययावत संगणक प्रयोगशाळा साकारल्या आहेत.

श्रीनगर - समाजातील विधायक कामांना नेहमीच बळ देणाऱ्या ‘सकाळ माध्यम समूहा’ने देशाचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जम्मू-काश्‍मीरमध्येही ज्ञानज्योत प्रज्ज्वलित केली आहे. ‘सकाळ रिलीफ फंडा’ने दिलेल्या आर्थिक पाठबळातून येथील गांधी मेमोरियल महाविद्यालयात तसेच गंदरबल आणि गुटलीबाग येथील माध्यमिक शाळांमध्ये अद्ययावत संगणक प्रयोगशाळा साकारल्या आहेत. काश्‍मीरमधील ‘स्प्रिंग बड्‌स एज्युकेशनल ट्रस्ट’ आणि ‘सरहद पुणे’ या दोन संस्थांनी या प्रयोगशाळांच्या उभारणीसाठी विशेष प्रयत्न केले आहेत.

जिल्हा विकास आयुक्त फारुख अहमद लोण यांनी गांधी महाविद्यालयातील अद्ययावत प्रयोगशाळेचे काल उद्‌घाटन केले. कार्यक्रमाला ‘सकाळ माध्यम समूहा’चे मुख्य संपादक श्रीराम पवार, ‘सरहद फाउंडेशन’चे संजय नहार, ‘स्प्रिंग बड्‌स एज्युकेशन ट्रस्ट’चे अध्यक्ष महंमद शफी कुरेशी, गांधी मेमोरियल महाविद्यालयाचे उपप्राचार्य बिलाल अहमद यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

काश्‍मीरमध्ये अशा उपक्रमांची अधिकाधिक गरज असल्याचे सांगून बिलाल अहमद यांनी ‘सकाळ रिलीफ फंडा’ने अद्ययावत शिक्षणासाठी दिलेल्या योगदानाबद्दल प्रशंसोद्गार काढले. अन्य वक्‍त्यांनीही संगणकीय शिक्षणावर भर दिला. विद्यार्थ्यांना सध्याच्या स्पर्धात्मक वातावरणात टिकाव धरता यावा म्हणून शिक्षकांनीच त्यांना तसे प्रशिक्षण द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

‘स्प्रिंग बड्‌स एज्युकेशन ट्रस्ट’ ही संस्था माहिती तंत्रज्ञान, आरोग्यसेवा या क्षेत्रांत १९९० पासून कार्यरत आहे. सामाजिक कार्यकर्ते महंमद शफी कुरेशी आणि सरचिटणीस शाहनवाझ शफी यांच्या मार्गदर्शनाखाली या संस्थेच्या सामाजिक कार्याचा विस्तार झाला. आरोग्य आणि शिक्षण सेवेचा विस्तार हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून संस्थेने आतापर्यंत अनेक लोकोपयोगी उपक्रमांचे आयोजन केले आहे. भविष्यातही मोफत आरोग्य शिबिरे आणि विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणोपयोगी साहित्यांचे वाटप अशा प्रकारचे उपक्रम हाती घेतले जाणार आहेत.

Web Title: Sakal Media Group which always supports the creative work of society