#Sakalforkerala ई वर्षेम ओणम इल्ल्या...

Siji-Thomas
Siji-Thomas

नायतोडा, (कोची) - ‘‘न्यागांलुडे नाटील ओणम ओरू आगोषमाण. एल्ल्यावरूम पुदिया वास्त्रगांल अनियूम, एल्लावीटीलूम पुकाल्म इडूम. पलातरम, कारीगल उंडाकूम. पलातरम पायसंगलूम उंडाकूम. ओणकलीम तिरुवादीतिरा कलीयूम उंडाकूम. जातीमाताभेदमन्य एल्लवरुम ओणम आगोशिक्‍यूम वेल्लापोकतील विडम वीटूकारम नष्टपेट्टा न्यागांल ई वर्षेम ओणम इल्ल्या...’’

नायतोडमधील सिजी हे सगळं मल्याळममध्ये सांगत होत्या. ते तसे तुमच्यापर्यंत पोचविण्याचे कारण आपल्या पारंपरिक उत्सवावर जेव्हा पाणी फेरले जाते, 

तेव्हा काय भावना असू शकतात, हे कळावे म्हणून. सिजीच्या बोलण्याचा अर्थ असा आहे, ‘‘आमचा ओणम सण खूप मोठा असतो. या सणानिमित्त घरामध्ये सजावट करतो. ज्यामुळे घराला देखणे रूप येते. शिवाय, नवे कपडे, वस्तू आणतो. सर्वधर्मीय लोकांचा सहभाग असतो. घर आणि गावात पंधरा दिवस उत्साहाचे वातावरण असते. परंतु, यंदा पुरात सगळे उद्‌ध्वस्त झाले आहे. त्यामुळे सण कसा करायचा?’’

सिजीचे घर आणि अंगण रंगीबेरंगी दिव्यांच्या माळा, आकर्षक रांगोळी, फुलांनी नटलेले असायचे. छोटी-छोटी मुले पारंपरिक खेळ खेळायचे; पण यंदा घराच्या अंगणात गाळ, वाहून आलेला कचरा पडला होता. तिच्या घरातील सगळी मंडळी घर साफ करीत होती. सिजी आपल्या उत्सवाचे महत्त्व, कार्यक्रम आणि त्यांचा उद्देश आम्हाला सांगत होती. पण, हा उत्सव होत नसल्याचे दुःख तिच्या चेहऱ्यावर लपून राहात नव्हते. घरी काहीच केले नाही, हे ती मुलांना समजून सांगत होती.

महाराष्ट्रात ज्या उत्साहात दसरा-दिवाळी साजरी होतात, तितकेच महत्त्व केरळात ओणमला आहे. दिमाखात साजरा होणारा ओणम यंदा मात्र होत नाही. या सणाला शनिवारपासून (ता. २५) सुरवात झाली. विष्णूचा अवतार असलेला राजा महाबली आपल्या प्रजेच्या भेटीला आला होता. तो दिवस म्हणजे ओणमचा दिवस.

यंदा बहुतांशी भागात पावसाने थैमान घातले. हजारो घरांचे नुकसान झाले. त्याचबरोबर जीवितहानी आणि वित्तहानी झाली. या घटनेने संपूर्ण केरळ हादरले. शेती आणि उद्योगांचेही अतोनात नुकसान झाले. शेतकरी अडचणीत सापडला आहे. या पुराचा तडाखा सर्वच घटकांना बसल्याने हा सण साजरा होत नसल्याचे दिसून आले. ज्या भागात होतो, तोही अगदी साधेपणाने.

कार्यक्रम रद्द करून मदत
लोकांकडे पैसा नसल्याने सण साजरा करता येत नसल्याचे रोहित सांगत होता.राज्य सरकारकडून ओणमनिमित्त दर वर्षी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्यासाठी यंदा सहा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. मात्र, कार्यक्रम रद्द करून पूरग्रस्तांना मदत करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. संस्था-संघटनांनीही कार्यक्रम न घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com