'ई-कॉमर्स'वरील विक्री तीनपटीने वाढली

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

मुंबई : स्वस्त इंटरनेट, घसघशीत सवलती आणि घरपोच सेवा यामुळे लोकप्रिय झालेल्या ई-कॉमर्स मंचाने अल्पावधीतच बाजारपेठेला काबीज केले आहे. गेल्या दोन वर्षांत देशातील ई-कॉमर्समधून होणाऱ्या विक्रीत तीन पटीने वाढ झाली आहे. ई-कॉमर्सची जागतिक बाजारपेठेत वार्षिक 15 टक्‍क्‍यांनी वाढ होत असून, भारतातील वृद्धी दर थक्क करणारा असल्याचा निष्कर्ष एका अभ्यासातून समोर आला आहे. 

मुंबई : स्वस्त इंटरनेट, घसघशीत सवलती आणि घरपोच सेवा यामुळे लोकप्रिय झालेल्या ई-कॉमर्स मंचाने अल्पावधीतच बाजारपेठेला काबीज केले आहे. गेल्या दोन वर्षांत देशातील ई-कॉमर्समधून होणाऱ्या विक्रीत तीन पटीने वाढ झाली आहे. ई-कॉमर्सची जागतिक बाजारपेठेत वार्षिक 15 टक्‍क्‍यांनी वाढ होत असून, भारतातील वृद्धी दर थक्क करणारा असल्याचा निष्कर्ष एका अभ्यासातून समोर आला आहे. 

ऑनलाइन खरेदीसंदर्भातील ग्राहकांच्या आवडीनिवडीबाबत नुकताच "नील्सन' या संस्थेकडून सर्व्हे करण्यात आला. इंटरनेट वापरणारे जवळपास 98 टक्के ग्राहक ऑनलाइन खरेदीला पसंती देत असल्याचे या पाहणीत आढळून आल्याचे म्हटले आहे. 
ई-कॉमर्स क्षेत्रातील कंपन्या हळूहळू जम बसवू पाहत आहेत. दक्षिण कोरियामध्ये उदयास आलेल्या ई-कॉमर्स संकल्पनेने जगभर विस्तार केला आहे. 

दक्षिण कोरियात "एफएमसीजी'तील एकूण विक्रीपैकी 20 टक्के हिस्सा ई-कॉमर्स आहे. खरेदीचा ट्रेंड काळानुरूप बदलतो आहे. माहिती तंत्रज्ञानाचा विस्तार, ई-कॉमर्स कंपन्यांची विश्‍वासार्हता, सोयीनुसार खरेदी, तसेच वस्तू परत करण्याची सुटसुटीत पद्धत, यामुळे ग्राहक ई-कॉमर्सकडे वळाला आहे. 

पॅकबंद किराणा, सौंदर्य प्रसाधने यांच्या खरेदीकडे भारतीयांचा कल असल्याचे "नील्सन'चे दक्षिण आशियाचे कार्यकारी संचालक समीर शुक्‍ला यांनी सांगितले. ऑनलाइन किराणा बाजारपेठेत प्रचंड वृद्धीच्या संधी असल्याचे शुक्‍ला यांनी स्पष्ट केले. ई-कॉमर्समध्ये भविष्यात डिजिटल क्रांती होणार असून, ग्राहकांच्या आवडी- निवडीनुसार वस्तू आणि सेवांची ई-कॉमर्स मंचावरून विक्री केली जाईल, असे त्यांनी सांगितले. 

पॅकबंद किराणा, भाजीपाल्यालाही मागणी 

ई-कॉमर्स मंचावरील लोकप्रिय वस्तू आणि सेवांमध्ये ट्रॅव्हल 69 टक्के, फॅशन 66 टक्के आणि मोबाईल 63 टक्के हिस्सा आहे. याशिवाय ऑनलाइन पॅकबंद किराणा, भाजीपाला, लहान मुलांच्या वस्तू आदी श्रेणींमध्येही 2017 च्या तुलनेत प्रचंड वाढ झाल्याचे दिसून आले आहे. दैनंदिन वापराच्या वस्तूंना (एफएमसीजी) ई-कॉमर्स मंचावरून सर्वाधिक मागणी असल्याचे निरीक्षण "नील्सन'ने नोंदवले आहे. 

ई-कॉमर्स क्षेत्रासंदर्भातील निष्कर्ष 

- जागतिक बाजारपेठ 70 अब्ज डॉलरवर, 15 टक्के वृद्धीदर 
- भारतातील ई-कॉमर्स उलाढालीत तीनपट वाढ 
- ट्रॅव्हल, फॅशन, आयटी- मोबाईल यांना पसंती 
- पॅकबंद किराणा नव्याने लोकप्रिय झालेली श्रेणी 
- 40 टक्के ग्राहकांकडून पॅकबंद किराणाची खरेदी 

Web Title: Sales on e commerce increased by three times