18 वर्षांपूर्वीच्या खटल्यातून सलमान दोषमुक्त

वृत्तसंस्था
बुधवार, 18 जानेवारी 2017

"हम साथ साथ है' या चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी 1 ऑक्‍टोबर 1998 रोजी ही घटना घडली होती. त्या वेळी सलमानबरोबर हे सारे कलाकार उपस्थित असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

जोधपूर - अभिनेता सलमान खान याच्यावर 18 वर्षांपासून सुरु असलेल्या बेकायदा शस्त्र बाळगल्याच्या प्रकरणातून आज (बुधवार) जोधपूर सत्र न्यायालयाकडून दोषमुक्त ठरविण्यात आले आहे. या निर्णयामुळे सलमान खानला मोठा दिलासा मिळाला आहे. 

मुख्य न्यायदंडाधिकारी दलप्रीतसिंह राजपुरोहित यांनी आज या प्रकरणी निकाल दिला. या सुनावणीला सलमान हजर होता. सलमानला सुनावणीला हजर राहण्याचे आदेश यापूर्वीच देण्यात आले होते. दोन्ही बाजूंनी आपले अंतिम म्हणणे मांडून झाल्यानंतर न्यायालयाने त्याला दोषमुक्त ठरविले.

शस्त्र परवान्याची मुदत संपली असतानाही बंदूक बाळगणे आणि त्याचा वापर करणे यासाठी सलमानविरोधात 1998 मध्ये वन विभागाने गुन्हा दाखल केला होता. हा आरोप सिद्ध झाल्यास सलमानला सात वर्षे तुरुंगवासाची शिक्षा होण्याची शक्यता होती.

राजस्थानमधील कणकली या गावात काळविटाची शिकार केल्याचा सलमान खानवर मुख्य आरोप होता, तर अन्य कलाकार सह आरोपी होते. त्याला याप्रकरणी यापूर्वीच निर्दोष मुक्त करण्यात आले आहे. 'हम साथ साथ है' या चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी 1 ऑक्‍टोबर 1998 रोजी ही घटना घडली होती.

Web Title: Salman Khan acquitted in 18-year-old Arms Act case