लघुशंकेमुळे सलमान अडकला; काळवीट शिकार प्रकरणाचा टर्निंग पॉइंट

वृत्तसंस्था
गुरुवार, 5 एप्रिल 2018

काळवीट शिकार प्रकरणात दबंग सलमान खानला अखेर पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. या हायप्रोफाईल खटल्यात एक साक्ष महत्त्वाची ठरली. ही साक्ष होती पूनमचंद बिष्णोई यांची.

मुंबई : काळवीट शिकार प्रकरणात दबंग सलमान खानला अखेर पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. या हायप्रोफाईल खटल्यात एक साक्ष महत्त्वाची ठरली. ही साक्ष होती पूनमचंद बिष्णोई यांची. काळवीट शिकार झाली त्या रात्री पूनमचंद हे लघुशंकेसाठी घराबाहेर आले आणि त्यांना सलमान काळविटाची शिकार करत असल्याचे लक्षात आले. त्या रात्री नेमके काय झाले. याचा खुलासा बिष्णोई यांनी केला. 

बिष्णोई म्हणाले, "मी लघुशंकेसाठी घराबाहेर गेलो. त्यावेळी मला गोळीबाराचा आवाज आला. मला जीपची हेडलाईट दिसली. त्यानंतर मी शेजारी राहणाऱ्या छोगारामला उठवले आणि आम्ही जीपच्या मागे गेलो. त्या जीपमध्ये सलमान, तब्बू, नीलम आणि सोनाली बेंद्रे बसली होती. बाकीचे कलाकार सलमानला शिकार करण्यासाठी प्रोत्साहन देत होते. सलमाननेही लगेचच बंदुकीने गोळी झाडत दोन काळविटांची शिकार केली. मी आणि समाजातील अन्य मंडळींनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर सलमान आणि इतर कलाकारांनी घाबरून काळविटांना तिथेच सोडून पळ काढला." 

पुनमचंद बिष्णोईंनी जीपचा नंबर लिहून घेतला आणि वन विभागाला या घटनेची माहिती दिली. न्यायवैद्यक चाचणीत सलमानच्या जीपमधील रक्ताचे नमुने काळवीटाचेच असल्याचे स्पष्ट झाले. हायप्रोफाईल केसमध्ये साक्षीदार साक्ष फिरवतात, असे अनेकदा दिसते. मात्र, या खटल्यात पुनमचंद आणि छोगाराम या दोघांनीही शेवटपर्यंत साक्ष फिरवली नाही. त्यांची साक्षच सलमानच्या शिक्षेसाठी पुरेशी ठरली. काळविटांचे शवविच्छेदन अहवाल आणि या दोन साक्षीदारांची साक्ष सलमानसाठी अडचणीची ठरली आणि शेवटी त्याला न्यायालयाने दोषी ठरवले.

Web Title: Salman Khan found guilty Blackbuck Poaching Case