सलमान खान आजही तुरुंगातच ; जामिनावर उद्या निर्णय

वृत्तसंस्था
शुक्रवार, 6 एप्रिल 2018

काळविट शिकारप्रकरणी अभिनेता सलमान खानला जोधपूर न्यायालयाने काल (गुरुवार) दोषी ठरवत पाच वर्षांची शिक्षा सुनावली. याशिक्षेबरोबरच 10 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला. त्यानंतर सलमानच्या वकिलांनी जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली. मात्र, आज त्यावर निर्णय होणे अपेक्षित असताना न्यायालयाने सलमानच्या जामीन अर्जावर निकाल राखून ठेवला आहे.

जोधपूर : काळविट शिकारप्रकरणी अभिनेता सलमान खानला जोधपूर न्यायालयाने काल (गुरुवार) दोषी ठरवत पाच वर्षांची शिक्षा सुनावली. याशिक्षेबरोबरच 10 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला. त्यानंतर सलमानच्या वकिलांनी जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली. मात्र, आज त्यावर निर्णय होणे अपेक्षित असताना न्यायालयाने सलमानच्या जामीन अर्जावर निकाल राखून ठेवला आहे. त्यामुळे आजचा दिवसही सलमान खानला तुरुंगातच घालवावा लागणार आहे.

काळविट शिकारप्रकरणी सलमान खानला न्यायालयाने दोषी ठरवले. तर या प्रकरणात सहआरोपी असलेल्या चौघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. याप्रकरणी निकाल ऐकण्यासाठी सलमान खान, सैफअली खान, तब्बू, सोनाली बेंद्रे आणि नीलम हे कलाकारही न्यायालयात उपस्थित राहिले होते. सलमान वगळता या सर्वांना निर्दोष मुक्त करण्यात आले. या प्रकरणाची अंतिम सुनावणी 28 मार्चला संपली होती. त्यावेळी मुख्य न्यायदंडाधिकारी देवकुमार खत्री यांनी निकाल राखून ठेवला होता. अखेर काल त्याला पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली.

शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर लगेचच सलमान खानने त्याच्या वकिलामार्फत जामीन अर्ज दाखल केला होता. त्या जामीन अर्जावर न्यायालयाकडून आज निकाल येणे अपेक्षित होते. मात्र, न्यायालयाने सलमानच्या जामिनवरील निकाल राखून ठेवला असून, आता यावर उद्या (शनिवार) सकाळी साडेदहाच्या सुमारास निकाल येण्याची शक्यता आहे.

Web Title: Salman Khan to spend another night in jail after Jodhpur court reserves bail order