'सप', 'बसप'ने २३ वर्षांपूर्वीची 'ती' कटू आठवण विसरली तरच...

वृत्तसंस्था
रविवार, 13 जानेवारी 2019

काय झालं होतं..?
बाबरी मशीद उध्वस्त केल्यानंतर उत्तर प्रदेशमधील कल्याणसिंह सरकार बरखास्त केले गेले. जनता दलातून बाजूला होत 'समाजवादी पक्ष' स्थापन करणारे मुलायमसिंह यादव आणि बहुजन समाज पक्षाचे संस्थापक कांशीराम यांनी एकत्र येत भाजपला सत्तेपासून दूर ठेवले. १९९३ मध्ये उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत 'सप'ला ११०, तर 'बसप'ला ६७ जागा मिळाल्या. अपक्ष आणि  इतर छोट्या पक्षांना साथीला घेत 'सप'ने सत्ता स्थापन केली. बसपने मुलायमसिंह सरकारला बाहेरून पाठिंबा दिला होता.

लखनौ : राजकारणामध्ये कोणीही कायमस्वरूपी मित्र किंवा शत्रू नसतो, असे म्हटले जाते. उत्तर प्रदेशामध्ये बहुजन समाज पक्ष आणि समाजवादी पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी आघाडी करण्याची केलेली घोषणा हीच उक्ती पुन्हा एकदा सिद्ध करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांना रोखण्यासाठी मायावती-अखिलेश यादव यांनी काल आघाडीची घोषणा केली.

पण बसप आणि सप एकत्र येण्याची ही घटना दिसते तेवढी सोपी नक्कीच नाही. यासाठी दोन्ही पक्ष आणि त्यांच्या प्रमुख नेत्यांना २३ वर्षांपूर्वीची ती कटू आठवण विसरावी लागणार आहे. 

काय झालं होतं..?
बाबरी मशीद उध्वस्त केल्यानंतर उत्तर प्रदेशमधील कल्याणसिंह सरकार बरखास्त केले गेले. जनता दलातून बाजूला होत 'समाजवादी पक्ष' स्थापन करणारे मुलायमसिंह यादव आणि बहुजन समाज पक्षाचे संस्थापक कांशीराम यांनी एकत्र येत भाजपला सत्तेपासून दूर ठेवले. १९९३ मध्ये उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत 'सप'ला ११०, तर 'बसप'ला ६७ जागा मिळाल्या. अपक्ष आणि  इतर छोट्या पक्षांना साथीला घेत 'सप'ने सत्ता स्थापन केली. बसपने मुलायमसिंह सरकारला बाहेरून पाठिंबा दिला होता.

त्यावेळी मायावती 'बसप'च्या प्रमुख नेत्या होत्या. कांशीराम यांच्या सूचनेनुसार, मायावती यांनी २ जून, १९९५ रोजी पक्षाच्या आमदारांची बैठक आयोजित केली होती. त्यात मुलायमसिंह सरकारचा पाठिंबा मागे घेण्याविषयी विचारमंथन सुरू होते. सायंकाळी ५.३०-६.०० च्या सुमारास 'सप'च्या अंदाजे २०० कार्यकर्त्यांनी या बैठकीच्या ठिकाणी हल्ला केला. 

उपस्थित असलेल्या  'बसप'च्या आमदारांना जोरदार मारहाण झाली. खुद्द मायावती यांनाही मारहाण झाल्याचे काही साक्षीदारांचे म्हणणे होते. या घटनेनंतर समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षामधील कटुता वाढतच गेली.

भूतकाळ विसरून आता आले एकत्र..!
त्यानंतर मायावती आणि सप यांचे संबंध बिघडलेच होते. पण २०१४ च्या निवडणुकीत भाजपने दिलेल्या जोरदार दणक्यामुळे आता आगामी लोकसभा निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांना स्वत:च्या भूमिकेत तडजोड करणे भाग पडले आहे. त्यामुळेच २३ वर्षांपूर्वीची ती कटू घटना विसरून आता मायावती आणि अखिलेश यादव यांनी हातमिळविणी केली आहे.

Web Title: Samajwadi Party and Bahujan Samaj Party alliance in Uttar Pradesh