'स.प.'च्या रौप्यमहोत्सवात "बेकी'चे दर्शन

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 6 नोव्हेंबर 2016

लखनौ - समाजवादी पक्षात निर्माण झालेली अंतर्गत यादवी नेताजी मुलायमसिंह यादव यांच्या हस्तक्षेपानंतर देखील शमलेली दिसत नाही. आज पक्षाच्या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमामध्ये पुन्हा याची झलक पाहायला मिळाली. शिवपाल यांनी व्यासपीठावरच अखिलेश यांच्यावर शाब्दिक वार केले. अखिलेश यांनीही हातात आलेल्या तलवारीचा मी वापर करेनच असा सूचक इशारा काका शिवपाल यांना दिला. समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील अखिलेश समर्थक आणि शिवपाल समर्थक असे दोन उभे गट पडले होते.

लखनौ - समाजवादी पक्षात निर्माण झालेली अंतर्गत यादवी नेताजी मुलायमसिंह यादव यांच्या हस्तक्षेपानंतर देखील शमलेली दिसत नाही. आज पक्षाच्या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमामध्ये पुन्हा याची झलक पाहायला मिळाली. शिवपाल यांनी व्यासपीठावरच अखिलेश यांच्यावर शाब्दिक वार केले. अखिलेश यांनीही हातात आलेल्या तलवारीचा मी वापर करेनच असा सूचक इशारा काका शिवपाल यांना दिला. समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील अखिलेश समर्थक आणि शिवपाल समर्थक असे दोन उभे गट पडले होते.

मुख्यमंत्री व्हायचं नाही - शिवपाल
काही लोकांना सत्ता वारसा हक्काने मिळते, यासाठी त्यांना विशेष त्याग करण्याची आवश्‍यकता भासत नाही, असा टोला अखिलेश यांना लगावत शिवपाल यादव यांनी आपल्याला मुख्यमंत्री होण्याची इच्छा नसल्याचे नमूद केले. अखिलेशने मला मंत्रिमंडळातून काढले अथवा माझा कितीही अपमान केला, तरीसुद्धा मी पक्षासाठी माझे रक्त आटवत राहीन. मागील चार वर्षांमध्ये मंत्री म्हणून आपण खूप परिश्रम घेतल्याचे शिवपाल यांनी या वेळी बोलताना सांगितले.

लोकप्रिय मुख्यमंत्री अखिलेश यांना मी सांगू इच्छितो, की तुम्हाला जे काही बलिदान हवे आहे ते देण्यास मी तयार असून, मला मुख्यमंत्री होण्याची इच्छा नाही. अखिलेश यांनी मुख्यमंत्री म्हणून चांगले काम केले असून, मी देखील चार वर्षे तितकेच चांगल्या पद्धतीने काम केले. सार्वजनिक बांधकाम, सिंचन, महसूल, सहकार आणि अन्य खात्यांमध्ये मी केलेले काम तुम्ही पाहू शकता, असेही शिवपाल यांनी सांगितले. विशेष म्हणजे अखिलेश यांनी व्यासपीठावरच काकांचे पाय धरल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

काका भावूक पक्षात

घुसखोरांमुळे तणाव
कितीही अपमान झाला तरी बोलणार नाही
नेताजींचा अपमान कधीही सहन करणार नाही

तलवार चालवणारच - अखिलेश
तुम्ही लोकांनी माझ्या हातात तलवार दिली आहे, त्या तलवारीचा वापर मी करेनच. उत्तर प्रदेशात 2017 मध्ये समाजवादी पक्ष पुन्हा सत्तेवर येईल, तसेच 2019 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत देखील आमच्या पक्षाची भूमिका निर्णायक असेल असा विश्‍वास मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी आज व्यक्त केला. हा प्रसंग पक्षाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असून समाजवादी विचारांची सारी मंडळी येथे एकत्र आली आहेत. नेताजींनी रक्त आणि घाम गाळून हा पक्ष उभा केला. आतापर्यंत आम्ही खूप मोठा प्रवास केला असला तरीसुद्धा आणखी बरेच अंतर आपल्याला पार करायचे आहे. आमच्या सरकारने राज्यात एक्‍स्प्रेसवे तयार केले. राज्यातील 55 लाखांपेक्षाही अधिक गरीब महिलांना निवृत्तिवेतन दिले. पूर्वी आम्ही संगणक आणि इंग्रजीच्या विरोधात होतो असे मानले जाते; पण मी नेताजींच्या वाढदिनी प्रथमच इंग्रजीमध्ये जाहिरात दिली. आम्ही एखाद्या भाषेच्या विरोधात नसून, एखादी भाषा आमच्या विरोधात जात असेल, तर आम्ही तिला विरोध करू. आम्ही तयार केलेल्या मार्गामुळे प्रगतीच्या प्रवासाला वेग आला. याच आधारे देशाची देखील प्रगती होईल, असे अखिलेश यांनी सांगितले.

अखिलेश बोल
पक्ष माझ्यामुळे सत्तेत आला असा माझा दावा नाही येथे बसलेल्या प्रत्येकास "स.प.'चा विजय हवा आहे. हा कार्यक्रम कार्यकर्त्यांमुळेच यशस्वी झाला.

Web Title: samajwadi party Silver Jubilee event