समाजवादी पक्ष फुटला;शिवपाल स्थापणार नवा पक्ष

वृत्तसंस्था
शुक्रवार, 5 मे 2017

नेताजी को उनका सम्मान दिलाने के लिये; और समाजवादियोंको एक साथ लाने के लिये इस मोर्चे का जल्द ही ऐलान होगा

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायम सिंह यादव यांचे पुत्र असलेल्या अखिलेश यादव यांचा राजकीय प्रभाव वाढल्यामुळे गेल्या काही महिन्यांत समाजवादी पक्षामध्ये उफाळून आलेल्या मतभेदांचे पर्यावसन अखेर हा पक्ष फुटण्यात झाले आहे. एकीकडे अखिलेश ; तर दुसरीकडे मुलायम यांचे बंधु शिवपाल यादव अशी समाजवादी पक्षामधील दरी रुंदावत असतानाच पक्षास उत्तर प्रदेश राज्यांत अत्यंत मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागला होता. या पार्श्‍वभूमीवर शिवपाल यांनी आज (शुक्रवार) "समाजवादी सेक्‍युलर मोर्चा' या नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली.

या पक्षाचे अध्यक्ष मुलायम हेच असणार असतील, असेही शिवपाल यांनी म्हटले आहे. मात्र मुलायम यांनी अद्यापी शिवपाल यांच्या या घोषणेस प्रतिसाद दिलेला नाही. मुलायम यांनी 1992 मध्ये समाजवादी पक्षाची स्थापना केली होती. मात्र शिवपाल यांच्या या घोषणेनंतर पक्षामधील मतभेद व शिवपाल यांच्या मनामधील खदखद अंतिमत: खऱ्या अर्थी उघड झाल्याचे आढळून आले आहे. कुटूंबामधील मतभेद मिटविण्यात मुलायम यांना अखेर अपयश आल्याचेच या नव्या पक्षाच्या घोषणेमधून स्पष्ट झाले आहे.

""नेताजी को उनका सम्मान दिलाने के लिये; और समाजवादियोंको एक साथ लाने के लिये इस मोर्चे का जल्द ही ऐलान होगा,'' असे शिवपाल यांनी म्हटले आहे. शिवपाल यांनी अजंत सिंह यादव या त्यांच्या मेहुण्याची इटावाह येथे भेट घेतली. या भेटीनंतर लगेचच शिवपाल यांनी ही संवेदनशील घोषणा केली. शिवपाल यांनी काही दिवसांपूर्वीच पक्षाची धुरा पुन्हा मुलायम यांच्या सोपविण्यात न आल्यास नव्या सेक्‍युलर फ्रंटची स्थापना केली जाईल, असा स्पष्ट इशारा अखिलेश यांना दिला होता.

या पार्श्‍वभूमीवर, आता मुलायम यांच्या भूमिकेविषयी अत्यंत उत्सुकता निर्माण झाली आहे. समाजवादी पक्षामधील या फुटीचे उत्तर प्रदेशमध्ये व राष्ट्रीय पातळीवरही दूरगामी राजकीय परिणाम होण्याची दाट शक्‍यता आहे.

Web Title: Samajwadi Party splits