कर्नाटकात राईनपाडा; एका व्यक्तीला केले ठार

वृत्तसंस्था
रविवार, 15 जुलै 2018

चॉकलेटने केला घोळ
कारमधून आलेल्या व्यक्ती हांदीखेर तांडा येथून जात असताना रस्त्याच्या बाजूला असलेली शाळा सुटली होती. मुले रस्त्यावरून जात असल्याचे पाहताच थांबून कारमधील व्यक्तींनी काही मुलांना चॉकलेट दिली. या वेळी कोणीतरी मुले पळविणारी टोळी असल्याचे ओरडले आणि पळापळ सुरू झाली. यातूनच जमावाने कारमधील व्यक्तींना मारहाण सुरू केली आणि पुढील घटना घडली.

उदगीर : जमावाने अफवेतून केलेल्या मारहाणीत पाच जणांचा बळी गेल्याची धुळे जिल्ह्यातील राईनपाड्यातील दुर्दैवी घटना ताजी असतानाच महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील गावात जमावाने कारवर केलेल्या हल्ल्यात हैदराबादमधील एकाचा मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले. त्यात एका सौदी अरेबियातील पोलिस अधिकाऱ्याचा समावेश आहे. पळून जाण्यात यशस्वी झाल्याने दोघे बचावले. जमावाने कारचा पाठलाग करून दगडांचा वर्षाव केला. कर्नाटक पोलिसांनी चाळीस संशयितांना अटक केली आहे. 

हैदराबादहून पाचजण नव्याकोऱ्या कारमधून येथून जवळच असलेल्या हांदीखेर (ता. औराद बाऱ्हाळी, जि. बिदर- कर्नाटक) येथे शनिवारी नातेवाइकांकडे एका कार्यक्रमाला आले होते. मुले पळविणारी टोळी समजून हांदीखेर शिवारातील शिरपूर तांडा येथील लोकांनी त्यांना मारहाण सुरू केली. या वेळी कारमधील दोघे पळून जाण्यात यशस्वी झाले. उर्वरित तिघांनी कारसह पलायन केले. ही कार मुर्कीकडे जात असल्याची माहिती लोकांनी तेथील ग्रामस्थांना मोबाईलद्वारे दिली. मुर्की ग्रामस्थांनी रस्त्यावर लाकडे टाकून कार अडविण्याचा प्रयत्न केला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्यालगतच्या खड्ड्यात उलटली.

जमावाने कारवर दगडांसह मिळेल त्या वस्तूंचा वर्षाव केला. हल्ल्यामुळे भयभीत तीन व्यक्ती कारबाहेर येण्यास धजावत नव्हत्या. घटनेचे मोबाईलमध्ये चित्रण करून ते सोशल मीडियावर पाठविण्यात अनेकजण व्यस्त होते. माहिती मिळताच कमालनगर (ता. बिदर) पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जमाव मोठा असल्याने जादा कुमक मागवली. तोपर्यंत जमावाच्या हल्ल्यात कारमधील मोहंमद आजम (36, हैदराबाद) याचा मृत्यू झाला. मोहंमद सालम (36), नूर मोहंमद गंभीर जखमी झाले. त्याच्यावर हैदराबादमधील यशोदा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील सालम हे कतार (सौदी अरेबिया) येथील पोलिस अधिकारी आहेत. कारमधून पळालेल्यांची सलमान व इब्राहीम अशी नावे असून त्यांनी पोलिस ठाण्याचा आसरा घेतला होता. कमालनगर पोलिसांनी मुर्की येथील चाळीसपेक्षा अधिक जणांना अटक केली असून, सध्या गावात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात आहे. 

चॉकलेटने केला घोळ 
कारमधून आलेल्या व्यक्ती हांदीखेर तांडा येथून जात असताना रस्त्याच्या बाजूला असलेली शाळा सुटली होती. मुले रस्त्यावरून जात असल्याचे पाहताच थांबून कारमधील व्यक्तींनी काही मुलांना चॉकलेट दिली. या वेळी कोणीतरी मुले पळविणारी टोळी असल्याचे ओरडले आणि पळापळ सुरू झाली. यातूनच जमावाने कारमधील व्यक्तींना मारहाण सुरू केली आणि पुढील घटना घडली.

Web Title: same incident in karnatka like rainpada case