अस्वस्थ वर्तमानाचे जयपूर साहित्य महोत्सवात प्रतिबिंब

सम्राट फडणीस
Thursday, 23 January 2020

कृत्रिम बुद्धीमत्ता, वातावरणातील बदलाचे वास्तव, स्त्री-पुरूष भेदभाव अशा विषयांसह नागरीकत्व  सुधारणा कायदा (सीएए), विद्यार्थी आंदोलने आणि केंद्राची व्यक्तिस्वातंत्र्याबद्दलची भूमिका अशा विषयांना स्पर्श केला.

जयपूर : अस्वस्थ वर्तमानाचे प्रतिबिंब आजपासून सुरू झालेल्या जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये दिसते आहे. जगातील सर्वांत मोठा 'साहित्य कुंभ' असे सार्थ नाव मिळविलेल्या महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी जागतिक आणि भारतीय वर्तमानावर साहित्यिक आणि कलाकारांनी सहिष्णुता, कृत्रिम बुद्धीमत्तेचे मानवासमोर उभे राहिलेले आव्हान, वातावरणातील बदलाचे वास्तव, स्त्री-पुरूष भेदभाव अशा जागतिक विषयांसह नागरीकत्व कायदा (सीएए), विद्यार्थी आंदोलने आणि केंद्र सरकारची व्यक्तिस्वातंत्र्याबद्दलची भूमिका अशा विषयांना स्पर्श केला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

गूगल नुकतीच एक ट्रिलियन डॉलरची कंपनी झाल्याचा संदर्भ देताना 'प्रेझेंट टेन्स' चर्चासत्रात आयरिश लेखक, संपादक फिंटन ओ'टुली यांनी जगातील सर्वाधिक संपत्ती एक-दोन टक्के कंपन्यांच्या हातात असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. वातावरणातील बदलाची जबाबदारी निश्चित करायलाच हवी, असे मत सहभागी आंतरराष्ट्रीय लेखक आणि ज्येष्ठ सनदी अधिकाऱयांनी मांडले. लेखिका, अभिनेत्री आणि निर्माती नंदिता दास यांनी 'शाहिन बागमधले आंदोलन धैर्य दाखविते,' असे प्रतिपादन केले. 'मंटो आणि मी' या चर्चासत्रात दास यांनी आजचे वातावरण धृवीकरणाकडे नेणारे आहे, असा आरोप केला. विद्यार्थी आंदोलनांना मोकळेपणाने समर्थन देताना दास यांनी '(सदाअत हसन) मंटो आज असते, तर त्यांनी राजकारण्यांना उघड सुनावले असते,' असे सांगितले.

आणखी वाचा - अशा महिलांनाच बलात्काऱ्यांसोबत जेलमध्ये ठेवा

महोत्सवात...

  • नोबेल, पुलित्झर, मॅन बुकर पुरस्कारांनी सन्मानित साहित्यिक सहभागी
  • पंधरा भारतीय भाषांसह एकूण 35 भाषिक लेखन परंपरांवर चर्चा-सादरीकरण
  • पाचशेहून अधिक साहित्यिक, लेखक, कलाकारांची मांदियाळी

'थिंकिंग अलाऊड' चर्चासत्रात कवी, जाहिरात तज्ज्ञ आणि केंद्रीय चित्रपट प्रमाणपत्र मंडळाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतूक केले. 'असहमत असण्यामध्येही डौल हवा. तो डौल हरविल्याचा मोठा प्रश्न भारतात आहे,' असे निरीक्षण नोंदवतानाच 'मोदी फक्त देशाचाच विचार करतात,' असे विधान केले. प्रसिद्ध लेखिका शोभा डे आणि कावेरी बामझाई यांच्या बोलण्यात '56 इंच छाती', 'मी टू' विषय डोकावले. बायकांनी आता गप्प नाही राहायचे, अशी भूमिका डे यांनी मांडली. बाळाला जसे वाढवता, तसे नवऱयालाही वाढविले पाहिजे, असा सल्ला बामझाई यांनी दिला. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेलहोत यांच्या हस्ते महोत्सवाचे औपचारिक उद्घाटन झाले. प्रख्यात गायिका, लेखिका शुभा मुदगल यांनी मुख्य भाषणात भारतातील आंतरशाखीय कला परंपरेचा गौरव केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: samrat phadnis writes report about jaipur literature festival 2020