'सॅमसंग इंडिया'तील कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार

वृत्तसंस्था
बुधवार, 3 जुलै 2019

दक्षिण कोरियातील "सॅमसंग'ने कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला

नवी दिल्ली : टेलिकॉम क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांना चिनी कंपन्यांकडून मोठे आव्हान देण्यात आले आहे. यामुळे अनेक कंपन्यांना याचा फटका बसला असून, मोबाईल उत्पादन क्षेत्रात मक्तेदारी असलेल्या दक्षिण कोरियातील "सॅमसंग'ने कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतातील एक हजार कर्मचाऱ्यांना डच्चू देण्याच्या विचारात कंपनी आहे. 

यापूर्वी सॅमसंगला नफा व त्याच्या मार्जिनमध्ये घट करण्याचा निर्णयही घ्यावा लागला होता. एका इंग्रजी दैनिकातील वृत्तानुसार सॅमसंगने खर्च कमी करण्यासाठी कर्मचारी कपातीचा निर्णय घेतला आहे. टेलिकॉम विभागातील 150 कर्मचाऱ्यांना कंपनीने आतापर्यंत काढले आहे. ऑक्‍टोबरपर्यंत आणखी काही कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा येण्याची शक्‍यता आहे. 

या विभागात होणार कपात 

विक्री, वितरण, संशोधन आणि विकास, उत्पादन, वित्त, मनुष्यबळ विकास, कॉर्पोरेट रिलेशन यांसारख्या विभागातील कर्मचाऱ्यांची नोकरी जाणार आहे. सॅमसंगचे मुख्य कार्यालय सोल येथे असून, तेथूनच कर्मचारीकपातीचा आदेश आला असल्याचे सांगण्यात आले. "सॅमसंग इंडिया'त एप्रिलपासून कर्मचारी भरती बंद करण्यात आली आहे. 

गेल्या आर्थिक वर्षापासून समस्या 

"सॅमसंग इंडिया'त 2017-2018 पासून अडचणी निर्माण होण्यास सुरवात झाली. कंपनीच्या निव्वळ नफ्यात त्या वेळी घट नोंदविण्यात आली. भारतात "शाओमी' आणि "वन प्लस'सारख्या चिनी कंपन्यांच्या ब्रॅंड जास्त लोकप्रिय होऊ लागल्याने सॅमसंगच्या विक्रीसमोर आव्हान उभे राहिले आहे. यामुळेच सॅमसंगला मोबाईल फोन आणि टीव्हीच्या किमती 25 ते 40 टक्‍क्‍यांनी कमी करणे भाग पडले आहे. भारतातील स्मार्टफोनच्या बाजारात शाओमीचा वाटा 29 टक्के असून, सॅमसंगचा 23, तर विवो कंपनीचा हिस्सा 12 टक्के आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Samsung India Responds to Job Cut