कर्नाटकातील दुष्काळ नदीजोडमुळे हद्दपार होईल - निराणी

कर्नाटकातील दुष्काळ नदीजोडमुळे हद्दपार होईल - निराणी

बेळगाव - राज्यातील दुष्काळग्रस्त तालुक्‍यांपैकी बहुतेक तालुके उत्तर कर्नाटकातील आहेत. कर्नाटकात उगम पावणाऱ्या व कर्नाटकातूनच समुद्राला जाऊन मिळणारे काळी नदीचे पाणी व्यर्थ ठरत आहे. त्याचा योग्य वापर झाल्यास उत्तर कर्नाटकातील दुष्काळी परिस्थिती नाहीशी होऊ शकते. यासाठी काळी-घटप्रभा-मलप्रभा नदीजोड प्रकल्प आवश्‍यक असल्याचे मत संगमेश निराणी यांनी व्यक्त केले.

शनिवारी (ता. २७) येथील इंजिनिअर्स हॉलमध्ये आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. श्री. निराणी यांनी स्वतः ‘अमृतधारा’ या नावे नदीजोड प्रकल्पाचा अभ्यास करून अहवाल तयार केला असून चर्चासत्रात त्यांनी हा अहवाल मांडला. उत्तर कर्नाटकातील जनतेतर्फे या अहवालाची माहितीनुसार अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. चर्चासत्रामध्ये धारवाड, बेळगाव, विजापूर, बालकोट जिल्ह्यांतील प्रमुख मठांचे महास्वामींसह पाटबंधारे, सार्वजनिक बांधकाम विभागातून निवृत्त झालेल्या अभियंते आणि शेतकऱ्यांचा समावेश होता. श्री. निराणी म्हणाले, ‘‘तीनही नद्यांना एकमेकांशी जोडल्यास उत्तर कर्नाटकात बारमाही पाणी राहणार असून दुष्काळ हद्दपार होणार आहे. सुपा धरणाची क्षमता १४.७ टीएमसी आहे पण, आजवर केवळ तीन ते चार वेळाच पूर्ण क्षमतेने धरण भरले असल्याचे सांगितले. 

म्हादई नदीचा वाद न्यायालयात पोचला आहे. व्यर्थपणे हे पाणी समुद्राला जाऊन मिळत आहे. काळी नदीचे पाणी एम. के. हुबळीजवळ जोडली जाऊ शकते तर १४० किलोमीटर अंतरावर गोकाकजवळ घटप्रभा नदीला जोडल्यास तिन्ही नद्यांचे १०० टीएमसी पाणी पाटबंधारे योजनेतून बेळगाव, बागलकोट, धारवाड आणि गदगला मिळू शकते. काळी नदीचे पाणी वाया न जाता जनतेला मिळू शकते. त्यासाठी उत्तर कर्नाटकातील जनतेने नदीजोड प्रकल्पाची मागणी लावून धरावी, तसेच शासनानेही मूर्तरूप द्यावे, अशी मागणी केली. 

रुद्राक्षी मठाचे सिद्धराम स्वामींसह अभिनव वप्पतेश्‍वर, मुरघराजेंद्र स्वामी, माजी अभियंता एस. एस. खणगावी, कल्याण मुचळंबी, आर. एस. मुतालिक, सिद्धरामप्पा इटी, भारतीय कृषक समाजाचे राज्याध्यक्ष सिद्धगौडा मोदगी, वासुदेव हरकल आदींसह विविध मठांचे मठाधीश, सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी, अभियंते उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com