हा तर भिजलेला लवंगी फटाका : संजय राऊत

Sanjay-Raut
Sanjay-Raut

नवी दिल्ली - विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत गृहसचिवांना दिलेल्या पुराव्यांची शिवसेना नेते संजय राऊत यांनी ‘भिजलेला लवंगी फटाका’ अशा शब्दांत आज खिल्ली उडवली. सरकारमधील काही अधिकारी जुन्या सरकारशी (फडणवीस सरकारशी) निष्ठा राखून असल्याचाही टोला त्यांनी लगावला. दिल्लीत पत्रकारांशी बोलताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कालच्या दिल्ली दौऱ्यावर कडाडून प्रहार केला. गृहसचिवांना भेटून फडणवीस यांनी महाराष्ट्रातील खंडणी प्रकरणाचे कथित पुरावे देत सीबीआय चौकशीची मागणी केली होती. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

फडणवीसांना चिमटा काढताना राऊत म्हणाले, ‘राज्यातील गृहखाते चुकीच्या गोष्टींच्या तपासासाठी सक्षम असताना त्यांनी त्यांच्याकडील माहिती मुख्यमंत्र्यांना द्यायला हवी होती. परंतु, त्यांच्याकडील माहितीमध्ये दम नसल्याने ते दिल्लीत आले. दिल्लीमध्ये अशा प्रकारचे भिजलेले फटाके वात लावून फोडण्याची सवय आहे.’’ 

पुढील सिनेमा कोणता येईल त्याची वाट पाहत असल्याचे सूचक आव्हानही त्यांनी भाजपला दिले. तसेच पश्चिम बंगालप्रमाणे महाराष्ट्रात आणि दिल्लीमध्ये ‘खेला होबे’ सुरू आहे, अशा शब्दांत भाजपकडून सुरू असलेल्या आरोपांचा समाचार घेताना संजय राऊत म्हणाले, ‘यामुळे लोकांचे मनोरंजन होत असून यावर कोणता करही भरण्याची गरज नाही. परमबीरसिंग यांनी बदलीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यावर भाष्य करताना राऊत म्हणाले, ‘परमबीरसिंग यांच्याच आग्रहावरून महाराष्ट्रात सीबीआयवर बंदी घालण्यात आली होती. आता तेच सीबीआय चौकशीची मागणी करत आहेत.’

अहवालाला किंमत नाही
‘सरकारमधील काही अधिकारी जुन्या सरकारच्या बाजूचे होते. त्यांनी काही कागदपत्र बनवले असतील. तो बॉम्ब घेऊन विरोधी पक्षनेते येथे आले होते. मात्र तो भिजलेला लवंगी फटाका होता. त्याला वातही नव्हती. तसेच फोन टॅपिंग अहवालाला काडीचीही किंमत नाही. सरकार अडचणीत येईल असे या अहवालात काहीही नाही. त्याची कितपत दखल घ्यावी हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ठरवतील.’

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com