गोवा निवडणुकांवरुन संजय राऊतांची ममतांवर सडकून टीका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay Raut
गोवा निवडणुकांवरुन संजय राऊतांची ममतांवर सडकून टीका

गोवा निवडणुकांवरुन संजय राऊतांची ममतांवर सडकून टीका

गोवा विधानसभा निवडणुकीपूर्वी (Goa Assembly Elections 2022) काँग्रेसविरोधी भूमिका घेतल्याबद्दल शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी रविवारी तृणमूल काँग्रेसवर टीका केली. शेजारच्या राज्यातील राजकीय समीकरणाबद्दल बोलताना राऊत म्हणाले की, गोव्यात ममता बॅनर्जी यांच्या तृणमुल काँग्रेस (Trinmool Congress) पक्षाच्या उपस्थितीचा भाजपला सर्वाधिक फायदा होणार आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना' मधील 'रोखठोक' या साप्ताहिक स्तंभात राऊत म्हणाले की, तृणमुलने काँग्रेससह इतर पक्षांमधील काही 'अस्थिर लोकांना' पक्षात घेतलं आहे. ही वृत्ती पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री बॅनर्जी (Mamata Banerjee) यांना शोभत नाही असंही ते म्हणाले आहेत.

हेही वाचा: CM चन्नींनी प्रियंका गांधींना का दिली मोदींच्या सुरक्षेची माहिती? भाजपचा नवा सवाल

संजय राऊत यांनी यावेळी आम आदमी आणि तृणमुलच्या गोव्यातील प्रवेशावर सडकून टीका केली आहे. 'गोव्यात निवडणुकांचं वातावरण आहे. आता तृणमूलच्या खांद्यावर बसून भाजपला गोवा पुन्हा जिंकायचे आहे. तृणमूल काँग्रेस व आपसारखे पक्ष गोव्यात येऊन पैशांचा वारेमाप वापर करतात. गोव्याची संस्कृती आणि पर्यावरण आधीच बिघडले. त्यात पैशांचा पाऊस सुरू झाल्याने सगळेच बिघडले.' असं म्हणत राऊत यांनी दोन्ही पक्षांवर निशाणा साधला. पश्चिम बंगालच्या राजकारणात ममतां बॅनर्जींचं समर्थन करणाऱ्या राऊत यांनी गोव्याच्या राजकारणावरून मात्र त्यांना चांगलंच धारेवर धरलं आहे.

हेही वाचा: मोदी लाटेतही फुललं नाही कमळ, आता SP च्या बालेकिल्ल्याला भाजप लावणार सुरुंग?

सामनामध्ये काय म्हटलंय?

कसली ही सकाळ? असं म्हणत राऊत यांनी रोख ठोकमध्ये तृणमुल काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. स्वतःच्या प्रतिमेवर निवडून येतील असे सर्व लोक तृणमूल काँग्रेसने जाळय़ात ओढल्याचा आरोप त्यांनी केला. काही नेत्यांबद्दल बोलताना ते म्हणाले, चर्चिल आलेमाव यांचा मूळ पक्ष कोणता? हे त्यांनाही आठवत नसेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात ते होते. आता तेही तृणमूलमध्ये गेले. अशा काही अस्थिर लोकांना घेऊन ममता बॅनर्जी यांना गोव्यातील नव्या सकाळचे स्वप्न पडले आहे. हे त्यांच्या प्रतिमेस शोभणारे नाही. गोव्यात काँग्रेसचे अस्तित्व शिल्लक ठेवायचे नाही ही भूमिका पंतप्रधान मोदी किंवा भारतीय जनता पक्षाची असू शकते, पण भाजपशी लढणाऱ्या ममता बॅनर्जीही त्याच काँग्रेसविरोधी भूमिकेस पाठबळ देतात. याचा फायदा शेवटी कोणाला होणार? गोव्यातील भाजपचे आमदार व संभाव्य उमेदवार हे एकजात हिस्ट्री-शिटर्स आहेत. अफू-चरसचा व्यापार करणारे लोक उघडपणे भाजपात प्रवेश करतात व मुख्यमंत्री सावंत त्यांचे स्वागत करतात असे चित्र रोज दिसते. प्रत्येक जण सौदेबाजी करीत आहे. गोव्यात एका बाजूला मंदिरे तर दुसऱ्या बाजूला भव्य चर्च आहेत. दोन्ही प्रार्थनास्थळांत घंटानादाचे महत्त्व आहे. या घंटा आता धोक्याच्या ठरू नयेत इतके गोव्याचे राजकीय वातावरण बिघडले आहे."

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Sanjay Raut
loading image
go to top