चला भारतीय पुत्राला वाचवूया....

संतोष धायबर
मंगळवार, 11 एप्रिल 2017

आवाहनः
भारतीय पुत्र कुलभूषण जाधव यांना भारतात परतण्यासाठी ट्विटरवरून #IMKulbhushan हा हॅशटॅग वापरून शुभेच्छा द्या. शिवाय, सविस्तर प्रतिक्रिया webeditor@esakal.com वर जरूर पाठवा.

भारतीय गुप्तहेर असल्याचा आरोप असलेले कुलभूषण जाधव यांना सोमवारी (ता. 10) पाकिस्तानमधील एका लष्करी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आणि देशवासीयांच्या मनात धस्स झाले. पाकिस्तानविरुद्ध हेरगिरी आणि घातपाती कारवायांमध्ये जाधव यांचा सहभाग असल्याचा आरोप पाकिस्तानी लष्कर परस्पर ठरवून मोकळे झाले आहे. भारतीय पुत्राच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे राहिलो तर ते नक्कीच सहीसलामत मायभुमीत परततील...

कुलभूषण जाधव यांना 3 मार्च 2016 रोजी बलुचिस्तानमधून पाकिस्तानी सुरक्षा अधिकाऱ्यांनी अटक केली. खरं तर जाधव यांचे इराणमधून अपहरण करण्यात आले होते. मात्र, ते पाकिस्तानमध्ये कसे सापडले याचे उत्तर अजूनही पाकिस्तानने अद्याप दिलेले नाही. आंतरराष्ट्रीय कायद्याने याची माहिती घेण्याचा अधिकार भारताला दिलेला आहे. पाकिस्तानमध्ये युद्धसदृश परिस्थिती निर्माण करण्यासाठी जाधव घातपाती कारवाया करत असल्याचा आरोप पाकने केला व पाकिस्तानी लष्कराने गुप्तहेर ठरवून फाशीची शिक्षाही सुनावली. जाधव यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी साधा वकिलही दिला नाही. भारताने 25 मार्च 2016 ते 31 मार्च 2016 या काळात 13 वेळा पाकिस्तानच्या उच्च आयोगाला कुलभूषण जाधव यांच्याविषयी माहिती मागितली. पण पाकिस्तानने त्याला अद्यापपर्यंत प्रतिसाद दिला नाही. जाधव यांच्याविरोधात कुठलेही निर्णायक पुरावे नसल्याचे पाकिस्तानचे परराष्ट्र संबंध सल्लागार सरताज अजीझ यांनी स्पष्ट केले होते. हेरगिरीप्रकरणी जाधव यांच्याविरोधात कोणतेही ठोस पुरावे नसल्याची कबुली पाकिस्तानने स्वतः दिली आहे, असे असतानाही ते शिक्षा देऊन मोकळे होतात. याचाच अर्थ की एका बाजूला एक बोलायचे अन् दुसऱया बाजूला आपले तुणतुणं वाजवायचे. पाकिस्तानचे हे रडगाणे जगाल नवीन नाही. खरंतर, मानवतेच्या दृष्टीकोनातून इतर देशांनीही पाकिस्तानवर दडपण आणायला हवे.

पाकिस्तानने जाधव यांचा व्हिडिओ 'तयार' करून सोशल नेटवर्किंगसह प्रसारमाध्यमांद्वारे प्रसारीत केला आहे. संबंधित व्हिडिओ कित्येकदा एडिट करून तयार केल्याचे दिसते, हे कोणीही सांगेल. पाकिस्तानला हवे तसे त्यांच्याकडून वदवून घेतल्याचे पहायला मिळते. एकत्रित व सलग व्हिडिओ दिसत नाही, यामधूनच सर्वकाही कळून चुकते. पाकिस्तानने आहे असा व्हिडिओ का प्रसारीत केला नाही, हा प्रश्न उपस्थित झाल्याशिवाय राहात नाही. पाकिस्तान सत्य लपविण्याचा का प्रयत्न करत आहे? परंतु, पाकिस्तानचे पितळ जगासमोर उघडे पडल्याशिवाय नक्कीच राहणार नाही, आणी आमचे जाधव आमच्या भूमित आणल्याशिवाय भारत शांत राहणार नाही. पाकिस्तानहो, हे तुम्ही लक्षात घ्या.

एका बाजूला हेरगिरीच्या संशयावरुन जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली जाते. दुसरीकडे मात्र, भारताच्या ताब्यात असलेला साजीद मुनीर या पाकिस्तानी हेरास स्वीकारावयास पाकिस्तान तयारही होत नाही. मुनीर तर हेरगिरीच्या आरोपांतर्गत दोषी आढळला होता. भारताने त्याला 12 वर्षांच्या कारवासाची शिक्षा सुनाविण्यात होती. शिक्षा पुर्ण झाल्यानंतरही पाकिस्तान त्याला ताब्यात घेण्यास तयार होत नाही. यामुळे भोपाळ पोलिस दलाकडून 10 महिन्यांपासून त्याची काळजी घेतली जात आहे, याला मानवतावादी दृष्टीकोन असलेला भारत देश म्हणातत. जाधव यांच्या विरोधात कोणताही पुरावा नसतानाही शिक्षा देऊन मोकळे होतात, या पाकिस्तानच्या वर्तनाला काय म्हणावे. आपण त्यांच्या हेराची देखभाल करतोय आणि ते काय कराहेत पहा? पाकिस्तान वाल्यांनो थोडफार मानवतावादीदृष्टीकोन बाळगायला शिका.... जाधव यांच्या शिक्षेचे वृत्त प्रसारीत झाल्यानंतर भारताने डझनभर पाकिस्तानी कैद्यांची सुटका न करण्याचाही निर्णय घेतला आहे. अन्यथा, या कैद्यांना बुधवारी सोडण्यात येणार होते. पाकिस्तानचे नाक दाबल्याशिवाय तोंड उघडणार नाही. यामुळे त्यांच्याबाबत अशी चाल खेळावीच लागणार आहे.

सांगली जिल्ह्याचे सुपुत्र असलेले कुलभूषण यांनी आनेवाडी (ता. जावळी, जि. सातारा) येथे फार्म हाऊस बांधले आहे. येथे आल्यानंतर ते शाळांत जाऊन विद्यार्थांना शैक्षणिक वस्तू पुरविणे, त्यांना गरजेनुसार मदत करणे हा छंद जोपासत होते. 'देशसेवा हीच खरी ईश्‍वर सेवा' अशी निष्ठा ठेवून देशाप्रती असणारा आदर आणखी दृढ करण्यासारख्या सेनेतील गोष्टी ते विद्यार्थ्यांना सांगत. कुलभूषण यांचे यावरून देशप्रेम दिसून येते. पाकिस्तानच्या हद्दीत चुकून गेलेले धुळे येथील जवान चंदू चव्हाण यांना सोडवून आणले, तसेच भारत सरकारने जोरदार ताकद लावून जाधव यांना मायभूमित आणले पाहिजे, असे प्रत्येक भारतीयाला आज वाटत आहे. संपूर्ण देश जाधव यांच्या पाठिशी खंबीरपणे उभा आहे.

मोदीजी, कुलभूषण जाधव यांना वाचवा!
मोदीजी, कुलभूषण यांना वाचवा यासाठी नेटिझन्सनी प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे. फेसबुक, ट्विटरवरून मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया नोंदविल्या जात आहेत. भारत सरकारनेही जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी कुलभूषण यांना 'भारतीय पुत्र' संबोधून पाकिस्तानवर दबाव आणला आहे.


कोण काय म्हणाले...

कुलभूषण जाधवप्रकरणी भारतानं कडक भूमिका घेतल्यानंतर आम्ही धमक्यांना घाबरत नसून, कोणालाही प्रत्युत्तर देण्यास पाकिस्तानी सैन्य सज्ज आहे.
- पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरिफ

पाकिस्तानी कोर्टाने मृत्यूदंडाची शिक्षा सुनावल्यानंतर भारतानेही आक्रमक पवित्रा घेतला आहे. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी द्विपक्षीय संबंधांवर याचे गंभीर परिणाम होतील, असा इशारा पाकिस्तानला दिला आहे. कुलभूषण जाधव यांना लढा देण्यासाठी लागेल ती कायदेशीर मदत केंद्र सरकार करेल.
- सुषमा स्वराज

कुलभूषण जाधव हे इराणमध्ये व्यवसाय करत होते. स्थानिक इराणी नागरिक त्यांचा व्यावसायिक भागीदार होता. व्यवसायानिमित्त ते तेहरानला येत-जात होते. मार्च 2016 मध्ये पाकिस्तानी सुरक्षा एजन्सीने कुलभूषण जाधव यांचे अपहरण केले. त्यानंतर पाक मीडियासमोर त्यांना भारताचे रॉ एजंट म्हणून भासवण्यात आले. पाक मीडियाला माहिती देताना कुलभूषण जाधवांकडे एक भारतीय पासपोर्ट मिळाला असे सांगण्यात आले. जर त्यांच्याकडे पासपोर्ट मिळाला तर ते हेर कसे असू शकतील.
- राजनाथसिंग, केंद्रीय गृहमंत्री

पाकिस्तानच्या ताब्यात असलेले कुलभूषण जाधव यांचा जीव वाचवणं हे सर्वात आधी महत्त्वाचं आहे. मोदी सरकारने आपली सर्व शक्ती पणाला लावून, कुलभूषण यांना परत आणावे.
- असदुद्दीन ओवेसी, एमआयएम, खासदार

पंतप्रधान मोदी हे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या मुलीच्या लग्नाला जातात. मग आता ते गप्प का. कुलभूषण जाधवांसाठी ते एक फोन करु शकत नाहीत का?
- काँग्रेस खासदार मल्लिकार्जुन खर्गे

कुलभूषण जाधव यांना परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
- सुभाष भामरे, संरक्षण राज्यमंत्री


देश पातळीवर सरकार पाकिस्तानवर दडपण आणत आहे. सर्वसामान्य नागरिक म्हणून आपणही कुलभूषण यांच्या पाठीशी राहूया...त्यांना लवकरात लवकर भारतात परतण्यासाठी शुभेच्छा देऊया... देशभक्ती म्हणून आपण सध्यातरी तेवढेच करू शकतो. प्रतिक्रियांच्या माध्यमातून दिलेल्या आपल्या शुभेच्छा नक्कीच त्यांच्यापर्यंत पोचतील अन् ते भारतात परततील, अशी अपेक्षा बाळगूया. चला भारतीय पुत्राला वाचवूया....
जय हिंद!!!!

Web Title: santosh dhaybar writes blog regardiing kulbhushan jadhav