पंतप्रधान म्हणाले, 'कलम 370 रद्द मागे पटेलांचीच प्रेरणा'

पंतप्रधान म्हणाले, 'कलम 370 रद्द मागे पटेलांचीच प्रेरणा'

केवाडिया (गुजरात) : भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दूरदृष्टीचे वर्णन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, पटेलांपासून प्रेरणा घेऊनच जम्मू-काश्‍मीरमधून कलम 370 रद्द करण्याचा निर्णय घेतला, असे प्रतिपादन केले. मोदींच्या 69 व्या वाढदिवसानिमित्त येथे आयोजित केलेल्या एका सभेत ते बोलत होते. 

काश्‍मीरबाबतच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर सरदार पटेलांचाच प्रभाव होता. त्यामुळेच सरकारने अनेक दशके जुन्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी नवा मार्ग अवलंबिला. हैदराबादचे सामिलीकरण हे सरदार पटेलांच्याच दूरदृष्टीचेच उदाहरण आहे. 1948 ला 17 सप्टेंबरलाच हैदराबाद संस्थान भारतीय संघराज्यात विलीन झाले होते,' असे मोदी म्हणाले. मोदी यांनी आज येथे उभारलेल्या "एकतेच्या पुतळ्या'लाही भेट दिली.

जगात सर्वांत उंच असलेला हा सरदार पटेलांचा पुतळा पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र बनत आहे. 133 वर्षे जुन्या असलेल्या अमेरिकेतील स्वातंत्र्य देवतेच्या पुतळ्याला दररोज सरासरी दहा हजार पर्यटक भेट देतात, तर केवळ 11 महिन्यांपूर्वी उभारलेल्या "एकतेच्या पुतळ्या'ला दररोज सरासरी 8500 पर्यटक भेट देतात, असे मोदींनी अभिमानाने सांगितले. सरदार सरोवर प्रकल्पामुळे कोट्यवधी लोकांना फायदा झाला असून, हा प्रकल्प पूर्ण करण्यात मदत केल्याबद्दल मोदींनी जनतेचे आभार मानले. 

नर्मदेची पूजा 

सरदार सरोवर धरण प्रथमच पूर्ण भरल्यानिमित्त राज्य सरकारने "नमामि नर्मदे' या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. पंतप्रधान मोदींनी या वेळी नर्मदेची पूजा केली. मोदींनी येथील फुलपाखरू उद्यानाला भेट देत त्यातील भगव्या रंगाच्या "टायगर बटरफ्लाय'ला राज्य फुलपाखराचा दर्जा दिला. त्यांनी या भागातील काही मंदिरांनाही भेटी दिल्या. या वेळी त्यांच्याबरोबर राज्याचे मुख्यमंत्री विजय रुपानी होते. 

आईचे आशीर्वाद घेतले 

पंतप्रधान मोदी यांनी आज 69 वर्षांत पदार्पण केले. सरदार सरोवर प्रकल्पाला भेट दिल्यानंतर त्यांनी त्यांच्या मातु:श्री हिराबा यांची भेट घेत त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यांच्यासमवेत मोदींनी भोजनही घेतले. मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू, संरक्षणमंत्री राजनाथसिंह आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुभेच्छा दिल्या. कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनीही मोदींना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com