शशिकला यांनी तुरुंगातून पाहिला शपथविधी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 17 फेब्रुवारी 2017

मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेण्यापूर्वी पलानीस्वामी हे त्यांच्या नव्या मंत्रिमंडळासह शशिकला तथा चिन्नम्मा यांचे आशीर्वाद घेण्यासाठी शुक्रवारी तुरुंगात जाऊन त्यांची भेट घेण्याची शक्यता आहे, असे अण्णा द्रमुकचे कर्नाटकमधील नेते व्ही.ए. पुगाझेंदी यांनी सांगितले.  

बंगळूर- पलानीस्वामी यांचा तमिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी व्ही.के. शशिकला यांनी गुरुवारी बंगळूरच्या मध्यवर्ती कारागृहातून टीव्हीवर पाहिला.

अण्णा द्रमुकच्या प्रमुख नेत्या शशिकला यांना बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी चार वर्षांचा तुरुंगवास झाला असून, त्या सध्या बंगळूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहेत. त्यांना शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर त्यांनी पोलिसांना शरण जाण्यापूर्वी पलानीस्वामी यांची तत्काळ पक्षनेतेपदी निवड केली. त्यानंतर पलानीस्वामी यांनी गुरुवारी चेन्नईमधील राज भवन येथे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. 

"शशिकला यांनी पलानीस्वामी आणि इतर 30 आमदारांच्या अनुक्रमे मुख्यमंत्री आणि मंत्रिपदाच्या शपथविधी समारंभाचे थेट प्रक्षेपण पाहिले. तुरुंगातील महिलांच्या बॅरकमध्ये त्यांची नणंद एलावारसी आणि इतर कैद्यांसोबत त्यांनी टीव्हीवर शपथविधी पाहिला," अशी माहिती एका तुरुंग अधिकाऱ्याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर दिली. 

शशिकला, एलावारसी आणि त्यांचा पुतण्या व्ही.के. सुधाकरन हे बुधवारी तुरुंगात आले आणि चार वर्षांची शिक्षा भोगण्यासाठी पोलिसांना शरण आले. 

मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेण्यापूर्वी पलानीस्वामी हे त्यांच्या नव्या मंत्रिमंडळासह शशिकला तथा चिन्नम्मा यांचे आशीर्वाद घेण्यासाठी शुक्रवारी तुरुंगात जाऊन त्यांची भेट घेण्याची शक्यता आहे, असे अण्णा द्रमुकचे कर्नाटकमधील नेते व्ही.ए. पुगाझेंदी यांनी सांगितले.  
 
Web Title: Sasikala sees Palaniswami take oath from Bengaluru jail