बंगालमध्ये दिवसा कामगार; रात्री दहशतवादी

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 28 जून 2019

दहशतवादी दिवसा कामगार आणि फेरीवाले म्हणून वावरत असत आणि रात्री दहशतवादी बनून तरुणांचे ब्रेनवॉशिंग करीत असल्याची बाब उघड झाली आहे.

कोलकता : कोलकता पोलिसांच्या विशेष कृती दलाने काल (गुरुवार) हावडा जिल्ह्यातील उलूबेरिया भागातून 'जमातुल मुजाहिदीन बांगलादेश' (जेएमबी) या दहशतवादी संघटनेच्या चार सदस्यांना अटक केली. हे दहशतवादी दिवसा कामगार आणि फेरीवाले म्हणून वावरत असत आणि रात्री दहशतवादी बनून तरुणांचे ब्रेनवॉशिंग करीत असल्याची बाब उघड झाली आहे. अटक करण्यात आलेला मोहसीन याआधी केरळमध्ये गेला होता. तेथेही त्याने त्याच्या संघटनेचा प्रचार केल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे. 

दिवसा कामगार म्हणून काम केल्यानंतर ही मंडळी रात्री सोशल मीडियावर ऍक्‍टिव्ह होत असत आणि तरुणांचे ब्रेनवॉशिंग करण्याचे काम ते करीत होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. तरुणांची माथी भडकावून ते त्यांना संघटनेमध्ये सामील करून घेत असत. यासंदर्भातील पाच ते सहा फेसबुक अकाउंट ऍक्‍टिव्ह असल्याची माहिती समोर आली आहे. मागील वर्षभरापासून ही मंडळी अशा पद्धतीने काम करीत होती.

काही वर्षांपूर्वी वर्धमान जिल्ह्यातील खागराघर भागात बॉंबस्फोट झाल्यानंतर 'जेएमबी' या दहशतवादी संघटनेच्या कारवाया उजेडात आल्या होत्या. या दहशतवादी संघटनेचे काही मदरशांसोबत लागेबांधे होते; तेथेच मुलांना दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण दिले जात असल्याचे उघड झाले आहे. 

सोशल मीडियाचा वापर 
तपास यंत्रणेची संशयाची सुई आपल्याकडे वळू नये म्हणून या संघटनेचे काही हस्तक केवळ सोशल मीडियाच्या माध्यमातून काम करीत होते. पोलिसांनी याप्रकरणी मोहानद जिऊर रहेमान ऊर्फ मोहसीन, मामूनूर रशीद, मोहंमद साही आलम ऊर्फ आलामीन यांना अटक केली असून, हे सर्वजण बांगलादेशी आहेत.

अटक झालेल्यांपैकी रबिरूल इस्लाम हा नयाग्राम वीरभूम जिल्ह्यातील रहिवासी आहे. यातील सहाही जणांचे फेसबुकवर बनावट अकाउंट्‌स असल्याचे आढळून आले आहे. हे सर्व 'इसिस'चेदेखील समर्थक आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: SAT of the Kolkata Police arrested four terrorist from Uluberia today