महाराष्ट्रातील एका मंत्र्याची पीएचडी बोगस : सत्यपाल सिंह

वृत्तसंस्था
शनिवार, 3 मार्च 2018

पीएचडीची पदवी घेणाऱ्या व्यक्तीकडे संपूर्ण विषयाची माहिती आणि ज्ञान असले पाहिजे. मात्र सध्याची तशी परिस्थिती नाही. पीएचडी शब्दाचा लॉंगफॉर्म माहीत नसणाऱ्या लोकांनीही ही पदवी घेतल्याचे मी पाहिले आहे

कुर्रकुलव (आंध्र प्रदेश)  - देशात "पीएचडी'संबंधीची कोणतीही माहिती नसणारे लोकही "पीएचडी' करीत असून, महाराष्ट्रातील एका मंत्र्याची "पीएचडी' अशाच प्रकारे झाली आहे,' असा गौप्यस्फोट वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध असलेले केंद्रीय मनुष्य विकास राज्यमंत्री डॉ. सत्यपाल सिंह यांनी जाहीर भाषणात केला. त्यामुळे महाराष्ट्रात तरी नव्याने वाद निर्माण होण्याची शक्‍यता असून, हा मंत्री कोण, याविषयीची चर्चा रंगू लागली आहे.

डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने आंध्र प्रदेशाच्या तिरुपती आंतरराष्ट्रीय विमानतळाशेजारी उभारण्यात आलेल्या फर्ग्युसन सेंटर फॉर हायर लर्निंगच्या उद्‌घाटनप्रसंगी बोलताना डॉ. सिंह म्हणाले, की पीएचडीची पदवी घेणाऱ्या व्यक्तीकडे संपूर्ण विषयाची माहिती आणि ज्ञान असले पाहिजे. मात्र सध्याची तशी परिस्थिती नाही. पीएचडी शब्दाचा लॉंगफॉर्म माहीत नसणाऱ्या लोकांनीही ही पदवी घेतल्याचे मी पाहिले आहे.

महाष्ट्रातील एका व्यक्तीकडे अशाच प्रकारची पीएचडी पदवी असून, तो महाराष्ट्रात मंत्री आहे. त्याचे नाव मी सांगणार नाही. त्याने पीएचडी घेतलेल्या विद्यापीठाचे नाव देखील सांगणार नाही. त्या मंत्र्याला मी विचारले, की तुम्ही कोणत्या विषयात पीएचडी केली आहे आणि तुमचे थेसिस काय? तेव्हा त्यांनी मला विषयाची व इतर माहिती दिली. मात्र तो विषय सांगण्यालायक देखील नाही. त्यांनतर मी पीएचडीच्या विषयाला मान्यता देणाऱ्या आणि पीएचडीत उत्तीर्ण करणाऱ्या विभागप्रमुखाला याबाबत विचारले होते. तेव्हा त्यांनी माझ्या हातात काही नव्हते. वरिष्ठ पातळीवरून मान्यता द्यायला माझ्यावर दबाव होता. मला दम भरला आणि धमकी दिल्याचे सांगितले. केवळ महाराष्ट्रच नाही, तर उत्तर प्रदेशातदेखील असे प्रकार होत आहेत. हे सर्व गंभीर प्रकार आहेत, असेही डॉ. सिंह यांनी नमूद केले.
डॉ. सिंह यांना मंत्र्याबाबत माहिती विचारली असता, त्यांनी "माझे नाव "सत्य'पाल आहे', असे म्हणत मी जे बोलतो ते खरं असल्याचा दावाच एकप्रकारे केला.

Web Title: satyapal singh maharashtra news