केजरीवालांना मंत्र्याने दिले दोन कोटी- कपिल मिश्रा

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 8 मे 2017

भेटीच्या दाव्यावर मिश्रा ठाम 
मिश्रा यांनी नव्या ट्‌विटद्वारे स्वत:वरील आरोप खोडून काढताना शनिवारी केजरीवाल यांची भेट घेऊन आपण त्यांना पाणीपुरवठा व जमीन गैरव्यवहारांबाबत सांगितल्याचे म्हटले आहे. शनिवारी आपण केजरीवाल यांना भेटलो नाही हा 'आप'चा दावा खोडून काढताना त्यांनी, मुख्यमंत्री निवासस्थानाचे सीसीटीव्ही चित्रण सार्वजनिक करा, असे खुले आव्हानच पक्षाला दिले आहे. आपण 'आप'चे संस्थापक आहोत. त्यामुळे आपल्याला कोणीही पक्षातून हटवू शकत नाही, असेही ते म्हणाले. 

नवी दिल्ली : आम आदमी पक्षातील अंतर्गत कलह शिगेला पोचला असून, पाणीपुरवठा मंत्रिपदावरून हकालपट्टी झाल्यानंतर कपिल मिश्रा यांनी थेट दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे. केजरीवाल यांना सत्येंद्र जैन यांनी 2 कोटी रुपये दिल्याचे मी माझ्या डोळ्यांनी पाहिले, असा खळबळजनक आरोप आज त्यांनी केला. हा पैसा जैन यांनी जमीन खरेदी गैरव्यवहारातून कमावल्याचेही त्यांनी नमूद केले. मिश्रा यांच्या आरोपांनंतर आक्रमक झालेल्या विरोधकांनी केजरीवाल यांच्या राजीनाम्यांची मागणी केली असताना कुमार विश्‍वास आणि 'आप'चे माजी नेते योगेंद्र यादव यांनी मात्र केजरीवालांचे समर्थन केले आहे. मिश्रांनी केजरीवालांवर केलेले आरोप निराधार असल्याचे 'आप'चे माजी नेते योगेंद्र यादव यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, कुमार विश्‍वास व केजरीवाल यांच्यात मागील आठवड्यातील बैठकीत दिलजमाई झाल्याचे जे चित्र उभे करण्यात आले होते ते फसवे असल्याचे ताज्या घडामोडींवरून दिसून येते. आपल्याला विरोध करणारा कोणीही केजरीवाल यांना सहन होत नसल्याचे जे सांगितले जाते त्या मालिकेत योगेंद्र यादव, प्रशांत भूषण यांच्यापाठोपाठ आता कुमार विश्‍वास व त्यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांचा मोठा गट सामील होणार असल्याचे दिसते. केजरीवाल यांच्या अरेरावीच्या स्वभावाला कंटाळलेल्या आमदारांचा विश्‍वास यांच्याशी सतत संपर्क असून, या मंडळींनी एक व्हॉटस्‌ऍप गटही स्थापन केल्याची माहिती आहे. दिल्लीतील पराभवाचे खापर 'ईव्हीएम'वर फोडण्यास विरोध करणाऱ्यांमध्ये मिश्रा हे अग्रभागी होते. मात्र, त्यांनी केजरीवाल यांच्यावर थेट आरोप केल्याने विश्‍वास यांचा गटही बिचकल्याचे दिसून येते. उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी, मिश्रा यांचे आरोप दखल घेण्याचाही पात्रतेचे नाहीत, असे सांगून ते उडवून लावले. 

अमानुल्लाखान यांना लॉटरी 
मिश्रा यांना मंत्रिमंडळातून हाकलताना केजरीवाल यांनी विश्‍वास यांच्यावर आरोप करणारे अमानुल्लाखान यांना काल बक्षिसी देताना त्यांची अनेक समित्यांवर नेमणूक केली आहे. या नियुक्तीनंतर हा गट बिथरला व मिश्रा यांनी आज केजरीवाल यांच्यावरच लाच घेतल्याचे आरोप केले. तत्पूर्वी, त्यांनी नायब राज्यपाल अनिल बैजल यांची भेट घेणे हेही लक्षणीय मानले जाते. मिश्रा यांनी जैन व केजरीवाल यांच्यात शुक्रवारी (ता. 5) झालेल्या पैशाच्या देवाणघेवाणीची माहिती देताना, खुर्चीच काय; प्राण गेला तरी बेहत्तर, पण यापुढे आपण गप्प राहणार नाही, असे सांगून आपल्या जिवाला धोका असल्याचेही सूचित केले. 'आप'मधून भाजपमध्ये आलेले अनेक कार्यकर्ते थेट अशीच तक्रार घेऊन दिल्ली भाजप प्रभारी श्‍याम जाजू यांच्याकडे रोज येत असतात. 

विश्‍वास यांचा राग 
स्वच्छ प्रतिमेच्या मिश्रा यांना मंत्रिपदावरून हटविल्याने कुमार विश्‍वास भडकले आहेत. पक्षातील सर्वोच्च, या 'आप'मधील शब्दाला त्यांनी कडाडून विरोध केला आहे. कोणाचीही असली तरी व्यक्तिपूजा आपल्याला अजिबात मान्य नसल्याचेही ते म्हणाले. 'आप'मध्ये केजरीवाल यांचा उल्लेख पार्टी सुप्रीमो असा होतो. विश्‍वास यांनी रात्री ट्‌विटद्वारे आपल्या भावना मांडल्या-'अगर तू दोस्त है तो फिर ये खंजर क्‍यूँ है हातों में। अगर दुश्‍मन है तो आखिर मेरा सर क्‍यूँ नहीं ले जाता ।।' असे त्यांनी म्हटले आहे. 

मागील 40 वर्षांपासून मी भ्रष्टाचाराविरोधात लढा देतो आहे, कधीकाळी केजरीवाल माझ्या शेजारी उभे ठाकले होते. 'इंडिया अगेन्स्ट करप्शन' या चळवळीमुळे केजरीवालांना दिल्लीचे मुख्यमंत्रिपद मिळाले. आता त्यांच्यावरच भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याने मला मोठा धक्का बसला असून, भावना व्यक्त करण्यासाठीही माझ्याकडे शब्दही उरलेले नाहीत. 
- अण्णा हजारे, ज्येष्ठ समाजसेवक 

केजरीवालांना मी बारा वर्षांपासून ओळखतो, त्यांनी कोणाकडून तरी लाच स्वीकारल्याची मला कल्पनाही करवत नाही. केजरीवालांनी लाच स्वीकारल्याची कल्पना शत्रूही करू शकत नाहीत. सत्येंद्र जैन यांना त्यांचे म्हणणे 'पीएसी'समोर मांडावे लागेल. त्यांच्यावरील आरोपांची सत्यताही पडताळून पाहिली जाईल. आम्ही कोणत्याही चौकशीसाठी तयार आहोत. 
- कुमार विश्‍वास, 'आप' नेते 

प्रतिकूल परिस्थितीमध्येच तुमच्या चारित्र्याची खरी परीक्षा होत असते. पक्षाचे जहाज बुडत असताना 'आप'च्या अवशेषाचं वास्तव दिसायला लागले आहे. पक्ष सर्वांत मोठी संधी गमावतो आहे. 
- प्रशांत भूषण, ज्येष्ठ विधीज्ञ, 'आप'चे माजी नेते 

कपिल मिश्रा यांनी तातडीने तक्रार दाखल करावी. चौकशीतूनच खरे सत्य बाहेर येईल. 
- किरण बेदी, नायब राज्यपाल, पुद्दुचेरी 

कपिल मिश्रा यांचे आरोप प्रतिक्रिया देण्यासही लायक नाहीत, त्यांचे बोलणे विवेकशून्यपणाचे असून, राज्यातील पाण्याच्या स्थितीवरून लोकांमध्ये नाराजी आहे. आमदारांना लोकांकडून अवमान सहन करावा लागतो आहे. शनिवारी सायंकाळीच मी त्यांना मंत्रिमंडळातील फेरबदलाची पूर्वकल्पना दिली होती. आज ते अशा प्रकारचे आरोप करत आहेत, याबद्दल मी आणखी काय बोलू शकतो? 
- मनीष सिसोदिया, दिल्लीचे उपमुख्यमंत्री 

कपिल मिश्रा यांनी केलेल्या आरोपांत काहीही नवीन नाही, हे आरोप नसून तो साक्षीदाराचा जबाब आहे. आता केजरीवालांनी मुख्यमंत्रिपदी राहण्याचा नैतिक आणि कायदेशीर अधिकार गमावला आहे. 
- मनोज तिवारी, भाजप नेते. 
 

Web Title: satyendra jain gave 2 crore to kejriwal, blames kapil mishra