सौदीतील महिलांच्या हाती आता चारचाकी 

वृत्तसंस्था
सोमवार, 25 जून 2018

सौदी अरेबियाच्या रस्त्यावर आता महिला चारचाकी गाडी चालवताना दिसल्या तर आश्‍चर्य वाटणार नाही. गेल्या सहा दशकांपासून सौदीतील महिलांवर गाडी चालवण्याचे असलेले निर्बंध आज अधिकृतरीत्या हटवण्यात आले. जगात केवळ सौदी अरेबियातच महिलांना चारचाकी गाडी चालवण्याची परवानगी नव्हती. या निर्णयाचे सौदीतील महिलांनी स्वागत केले असून, आज अनेक नोकरदार महिला गाडी चालवत कार्यालयात गेल्या. 
 

रियाध: सौदी अरेबियाच्या रस्त्यावर आता महिला चारचाकी गाडी चालवताना दिसल्या तर आश्‍चर्य वाटणार नाही. गेल्या सहा दशकांपासून सौदीतील महिलांवर गाडी चालवण्याचे असलेले निर्बंध आज अधिकृतरीत्या हटवण्यात आले. जगात केवळ सौदी अरेबियातच महिलांना चारचाकी गाडी चालवण्याची परवानगी नव्हती. या निर्णयाचे सौदीतील महिलांनी स्वागत केले असून, आज अनेक नोकरदार महिला गाडी चालवत कार्यालयात गेल्या. 

सौदी अरेबियातील महिलांसाठी रविवारचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. कारण सौदीतील महिलांना केवळ गाडीत बसण्याची परवानगी होती, गाडी चालवण्याची मुभा नव्हती. मात्र, रविवारपासून ही बंदी हटवल्याने सुमारे दीड कोटीहून अधिक महिला पहिल्यांदा रस्त्यावर गाडी घेऊन जाताना दिसतील. महिलांवर असलेली गाडी चालवण्याची बंदी उठवण्याचा निर्णय पहिल्यांदा सप्टेंबर 2017 रोजी घेण्यात आला होता. हा निर्णय युवराज मोहंमद बिन सलमान यांच्या व्हिजन 2030 कार्यक्रमाचा एक भाग होता. त्यांनी हा आदेश जून 2018 पर्यंत लागू करण्याची घोषणा केली होती. जेद्दाह येथील महिला हम्सा अल सोनोसी यांनी या निर्णयाचे स्वागत करताना म्हटले की, आपण कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की, सौदीत गाडी चालवू शकू. सर्वाधिक महिलांना वाहन परवाना देणारे जेद्दाह हे सौदी अरेबियातील दुसरे शहर आहे. सौदीत महिलांवर अनेक कडक निर्बंध असल्याने सौदी अरेबियाचे युवराज सलमान यांच्या निर्णयाचे जगात कौतुक होत आहे. या निर्णयानंतर काही मिनिटात स्वत: गाडी चालवत कार्यालयात पोचलेली टीव्हीवरील अँकर सबिक अल-दोसारी यांनी या निर्णयाला महिलांसाठी ऐतिहासिक क्षण असल्याचे म्हटले आहे. 

उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न 
महिलांना वाहन परवाना देण्याचा निर्णय हा देशाचे उत्पन्न वाढीच्या प्रयत्नाचा भाग मानला जात आहे. तेल, गॅस आणि हज यात्रेपासून होणाऱ्या उत्पन्नावर सौदीची अर्थव्यवस्था अवलंबून असून, ही अवलंबिता कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी उत्पादन आणि सेवा क्षेत्राला प्रोत्साहन दिले जाणार आहे. सौदीच्या नागरिकांना अर्थव्यवस्थेत अधिकाधिक सामावून घेण्याचे प्रयत्न केले जात आहेत. यातून देशातील उत्पादन वाढेल, असा कयास बांधला जात आहे. 

Web Title: Saudi Arabia will allow women To drive cars