एसबीआयमधील कर्मचाऱ्यांची भरती घटवणार

वृत्तसंस्था
सोमवार, 22 मे 2017

एसबीआयने 2013 सालापासून आपल्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत सहा ते सात हजारांची कपात केली आहे. निवृत्त कर्मचाऱ्यांच्या तुलनेत भरती होणाऱ्या कर्मचाऱ्यांचे प्रमाण कमी होत आहे. बॅंकेच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांनी तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे कर्मचाऱ्यांच्या भरतीचे प्रमाण कमी करावे लागणार असल्याचे म्हटले होते; परंतु सहयोगी बॅंकांसोबत एकत्रीकरणाचा नोकऱ्या किंवा वेतनावर कोणताही परिणाम होणार नसल्याचेही त्या म्हणाल्या

नवी दिल्ली - देशातील सर्वांत मोठी बॅंक असलेल्या स्टेट बॅंक ऑफ इंडियाने (एसबीआय) आपल्या सहयोगी बॅंकांच्या विलीनीकरणानंतर कर्मचाऱ्यांची भरती कमी करणार असल्याचे म्हटले आहे.

चालू आर्थिक वर्षात बॅंकेत कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार नसल्याचे स्टेट बॅंकेच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांनी सांगितले. त्यामुळे एसबीआय आणि सहयोगी बॅंकांच्या एकत्रीकरणातून तयार होणाऱ्या बॅंकेत नव्या कर्मचाऱ्यांना संधी मिळण्याची शक्‍यता धूसर झाली आहे. वर्षभरात या बॅंकेतील भरतीचे प्रमाण 25 ते 30 टक्‍क्‍यांनी घटण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

सध्या बॅंकेमध्ये गरजेपेक्षा अधिक मनुष्यबळ आहे. चालू वर्षात 13,000 लोक निवृत्त होणार असून आणि 3,600 लोकांनी व्हीआरएसचा (स्वेच्छानिवृत्ती योजना) पर्याय निवडला आहे, असेही भट्टाचार्य यांनी सांगितले.

"एसबीआय'मध्ये दरवर्षी सरासरी 15,000 ते 20,000 नव्या कर्मचाऱ्यांची भरती केली जाते आणि गेल्या वर्षात आम्ही 19,000 नव्या लोकांना नियुक्त केले आहे. मात्र, बॅंकेतून दरवर्षी सुमारे आठ ते दहा हजार कर्मचारी निवृत्त होतात. चालू वर्षाच्या सुरवातीला, एसबीआयने प्रोबेशनरी ऑफिसर्ससाठी (पीओ) 2,313 पद भरण्यासाठी भरती अधिसूचना जारी केली होती.

केंद्र सरकारने मंजुरी दिल्यानंतर गेल्या महिन्यात भारतीय स्टेट बॅंकेत (एसबीआय) स्टेट बॅंक ऑफ बिकानेर अँड जयपूर, स्टेट बॅंक हैदराबाद, स्टेट बॅंक ऑफ म्हैसूर, स्टेट बॅंक ऑफ पतियाळा आणि स्टेट बॅंक त्रावणकोर या सहयोगी बॅंकांचे विलीनीकरण झाले. आता एकत्रीकरणानंतर एसबीआयच्या शाखांची संख्या सहा हजारांवर पोचली असून, कर्मचाऱ्यांची संख्या 2.71 लाखांवर गेली आहे.

सहयोगी बॅंकांमधील भरतीचे प्रमाण गेल्या दोन वर्षांमध्ये तब्बल पन्नास टक्‍क्‍यांनी घटले आहे. त्याचप्रमाणे, हे कर्मचारी एसबीआयमध्ये दाखल झाल्यानंतर काही कामांची पुनरावृत्ती होऊ शकते. त्यामुळे नवी कौशल्ये विकसित करण्यावर बॅंकेचा भर असेल, असे जाणकारांचे मत आहे.

एसबीआयने 2013 सालापासून आपल्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत सहा ते सात हजारांची कपात केली आहे. निवृत्त कर्मचाऱ्यांच्या तुलनेत भरती होणाऱ्या कर्मचाऱ्यांचे प्रमाण कमी होत आहे. बॅंकेच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांनी तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे कर्मचाऱ्यांच्या भरतीचे प्रमाण कमी करावे लागणार असल्याचे म्हटले होते; परंतु सहयोगी बॅंकांसोबत एकत्रीकरणाचा नोकऱ्या किंवा वेतनावर कोणताही परिणाम होणार नसल्याचेही त्या म्हणाल्या.

Web Title: SBI to reduce hiring