शशिकला नटराजन यांना 4 वर्षांची शिक्षा

वृत्तसंस्था
मंगळवार, 14 फेब्रुवारी 2017

बेहिशेबी मालमत्ताप्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने शशिकला यांना शिक्षा सुनाविताना, लगेच आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले आहेत. शशिकला यांना किमान अजून तीन वर्षे तुरुंगात रहावे लागणार आहे.

नवी दिल्ली - तमिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न पाहत असलेल्या अण्णा द्रमुकच्या सरचिटणीस शशिकला नटराजन यांना आज (मंगळवार) सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने मोठा झटका बसला असून, त्यांना बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून दोषी ठरविण्यात आले आहे. न्यायालयाने त्यांना चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनाविली आहे. तसेच त्यांना दहा वर्षे निवडणूकही लढविता येणार नाही. 

बेहिशेबी मालमत्ताप्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने शशिकला यांना शिक्षा सुनाविताना, लगेच आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले आहेत. शशिकला यांना किमान अजून तीन वर्षे तुरुंगात रहावे लागणार आहे. न्यायाधीश पिनाकी चंद्र घोष आणि अमिताव रॉय यांच्या खंडपीठाने 7 जून 2016 ला सुनाविलेल्या निकालावर आज निकाल सुनाविण्यात आला. या प्रकरणात दिवंगत मुख्यमंत्री जयललिता या सुद्धा आरोपी होत्या.

तमिळनाडूत मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीसाठी माजी मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या निकटवर्तीय शशिकला नटराजन आणि माजी मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांच्यात संघर्ष सुरु होता. पण, न्यायालयाने आज सुनाविलेल्या निर्णयामुळे शशिकला यांची राजकीय कारकिर्द संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. तमिळनाडूच्या राजकीय पेचावर मार्ग काढण्यासाठी राज्यपालांनी ऍटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांच्याकडे सल्ला मागितला होता. त्यानुसार रोहतगी यांनी राज्यपालांना एका आठवड्याच्या आत विशेष अधिवेशन बोलावून बहुमत सिद्ध करून घेण्याचा सल्ला दिला होता. पण, आता शशिकला यांना दोषी ठरविण्यात आल्याने पनीरसेल्वम यांचा मार्ग मोकळा झाला आहे. पनीरसेल्वम यांना अनेक आमदार व खासदारांकडून पाठिंबा देण्यात येत आहे.

Web Title: SC convicts Sasikala in DA case, sentences her to 4 years in prison