सीबीआय करणार माजी सीबीआय संचालकांची चौकशी

वृत्तसंस्था
सोमवार, 23 जानेवारी 2017

या प्रकरणाच्या प्राथमिक मांडणीवरुन (प्राईमा फॅसी) सिन्हा यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर केल्याचे दिसून येत आहे. तेव्हा या प्रकरणाची चौकशी व्हावयास हवी

नवी दिल्ली - देशभर गाजलेल्या कोळसा गैरव्यवहारप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) माजी संचालक रणजित सिन्हा यांची सीबीआयमार्फत चौकशी करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज (सोमवार) दिले. या प्रकरणी नेमण्यात आलेल्या एका न्यायालयीन समितीने दिलेल्या अहवालाच्या पार्श्‍वभूमीवर सर्वोच्च न्यायालयामधील खंडपीठाचे प्रमुख न्यायाधीश एम लोकुर यांनी सिन्हा यांची चौकशी करण्याचे आदेश दिले.

"या प्रकरणाच्या प्राथमिक मांडणीवरुन (प्राईमा फॅसी) सिन्हा यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर केल्याचे दिसून येत आहे. तेव्हा या प्रकरणाची चौकशी व्हावयास हवी,'' असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. याप्रकरणी विशेष तपास पथकाची आवश्‍यकता नसल्याचे मत व्यक्त करत सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयकडून न्याय्य व नि:पक्षपाती चौकशी केली जाईल, असा आशावाद व्यक्त केला. या प्रकरणाच्या चौकशीसंदर्भात केंद्रीय दक्षता आयोगासही विश्‍वासात घेतले जावे, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.

या चौकशीसाठी विशिष्ट कालमर्यादा आखून घेण्याचे निर्देशही सर्चोच्च न्यायालयाकडून सीबीआय संचालक आलोक वर्मा यांना देण्यात आले.
न्यायालयीन समितीच्या अहवालामध्ये सिन्हा यांनी त्यांच्या निवासस्थानी य्या गैरव्यवहारामध्ये गुंतलेल्या काही जणांची भेट घेतल्याचे म्हटले आहे. य्या बैठकी य्या सर्वथा अयोग्य असल्याचे ताशेरे समितीने ओढले आहेत.

Web Title: SC orders probe against former CBI chief Ranjit Sinha