काश्मीरमध्ये आणखी एक शाळा जाळली

वृत्तसंस्था
सोमवार, 31 ऑक्टोबर 2016

हिज्बुल मुजाहिदीनचा कमांडर बुऱ्हान वणीला ठार मारल्यानंतर काश्मीर खोऱ्यात हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. काही जिल्ह्यांमध्ये अद्याप संचारबंदी लागू आहे.

श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात रविवारी आणखी एक सरकारी शाळा जाळण्यात आल्याचे समोर आले आङे. गेल्या दोन दिवसांत आग लावण्यात आलेली ही तिसरी शाळा आहे.

अनंतनाग जिल्ह्यातील ऐशमुकाम येथील जवाहर नवोदय विद्यालयाला फुटीरतावाद्यांनी आग लावली. यामध्ये विद्यालय पूर्णपणे जळून खाक झाले आहे. काश्मीर खोऱ्यात फुटीरतावाद्यांकडून शाळा बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे फुटीरतावाद्यांकडून शाळा जाळण्यात येत आहेत. गेल्या दोन महिन्यांत आतापर्यंत 20 शाळा जाळण्यात आल्या आहेत. काश्मीरमध्ये गेल्या 112 दिवसांपासून सरकारी व खासगी शाळा बंद आहेत.

हिज्बुल मुजाहिदीनचा कमांडर बुऱ्हान वणीला ठार मारल्यानंतर काश्मीर खोऱ्यात हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. काही जिल्ह्यांमध्ये अद्याप संचारबंदी लागू आहे. आतापर्यंत हिंसाचारात 85 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. 

Web Title: school-burnt-in-jammu-and-kashmir