द्विपक्षीय संबंधांची व्याप्ती विस्तारणार 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 11 जुलै 2018

कोरिया किनारपट्टीवर सुरू असलेल्या शांतता प्रक्रियेमध्ये भारताचाही सहभाग असून, त्या भागातील शांततेसाठी भारत प्रयत्नशील असेल. 

- नरेंद्र मोदी, पंतप्रधान 

नवी दिल्ली : आर्थिक, व्यापारी तसेच संरक्षण क्षेत्रासह नागरी अण्विक ऊर्जा सहकार्याची व्याप्ती अधिक विस्तारित करण्यावर भारत आणि दक्षिण कोरियाने आज शिक्कामोर्तब केले. द्विपक्षीय संबंधांची पातळी आणखी उंचावण्याच्या हेतूने "कोरिया-इंडिया फ्यूचर स्ट्रॅटेजी ग्रुप' आणि "इंडिया-कोरिया सेंटर फॉर रीसर्च अँड इनोव्हेशन कोऑपरेशन' या दोन गटांच्या स्थापनेचाही निर्णय करण्यात आला. भारताच्या अणुपुरवठादार गटातील प्रवेशासही दक्षिण कोरियाने पाठिंबा देऊ केला. 

दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जोई-इन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात आज शिष्टमंडळ पातळीवर चर्चा झाली. यानंतर जारी करण्यात आलेल्या द्विपक्षीय संबंधविषयक भावी रूपरेषेबाबतच्या संयुक्त निवेदनात उभय देशात सांस्कृतिक; तसेच नागरिकांच्या पातळीवर संबंध वाढविणे, आर्थिक उन्नतीस प्राधान्य आणि शांततेला प्राधान्य देतानाच दहशतवाद व कट्टरवादाच्या विरोधात मुकाबला करण्यासाठी उपाययोजना करण्यावर भर देण्यात आला आहे.

संरक्षण उत्पादनाच्या क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्याचे काही निर्णय यानिमित्ताने करण्यात आले. त्यामध्ये लार्सन अँड टुब्रो व कोरियन कंपनीद्वारे संयुक्तपणे उत्पादन केल्या जाणाऱ्या "वज्र' या तोफांच्या निर्मितीचा समावेश आहे. लष्करी प्रशिक्षण, संयुक्त सराव आणि अनुभवांच्या देवाणघेवाणीबरोबरच संरक्षण तंत्रज्ञानविषयक संशोधन व विकसन यालाही प्रधान्य देण्याचे ठरविण्यात आले आहे. 

भारतातील कुशल मनुष्यबळ आणि कोरियन तंत्रज्ञान यांचा संगम घडून त्याचा दोन्ही देशांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभ व्हावा, यावर उभय देशांनी एकमत व्यक्त करतानाच 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार 50 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट अधोरेखित केले. रस्ते बांधणी, अतिवेगवान रेल्वे यंत्रणा, वाहन निर्मिती उद्योग यांसारख्या क्षेत्रात सहकार्य व भागीदारी वाढविण्याचा संकल्पही दोन्ही देशांनी यानिमित्ताने सोडला आहे. शिष्टमंडळ पातळीवरील चर्चेनंतर विविध क्षेत्रातील 11 करारांवर सह्या करण्यात आल्या. 

Web Title: The scope of bilateral relations will be expanded