रेपो दरवाढीचा दुसऱ्यांदा दणका 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

मुंबई : जागतिक वित्त बाजारातील अनिश्‍चितता, मॉन्सूनची थंडावलेली वाटचाल, वित्तीय आघाडीवरील अपयश आणि खरीप हंगामात वाढवलेली किमान आधारभूत किंमत या घटकांचा चलनवाढीवर परिणाम होण्याची भीती रिझर्व्ह बॅंकेने बुधवारी व्यक्त केली. यामुळे सलग दुसऱ्या पतधोरणात बॅंकेने रेपो दर पाव टक्‍क्‍याने वाढवून तो 6.5 टक्के केला. ऑक्‍टोबर 2013 नंतर प्रथमच सलग दुसऱ्या पतधोरणात व्याजदर वाढवण्यात आले आहेत. 

रिझर्व्ह बॅंकेच्या मुंबईतील मुख्यालयात पतधोरण समितीच्या तीन दिवसीय बैठकीचा आज समारोप झाला. समितीचे अध्यक्ष गव्हर्नर डॉ. ऊर्जित पटेल यांच्यासह चार सदस्यांनी व्याजदरवाढीच्या बाजूने कौल दिला. समितीचे सदस्य रवींद्र ढोलकिया यांनी दरवाढीविरोधात मत दिले. दुसऱ्या तिमाहीत चलनवाढीचा दर 4.6 टक्के राहील, तर दुसऱ्या सहामाहीत तो 4.8 टक्के राहील, असा अंदाज रिझर्व्ह बॅंकेने व्यक्‍त केला आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ता वाढवल्याने चलनवाढीवर परिणाम होण्याची शक्‍यता रिझर्व्ह बॅंकेने व्यक्त केली आहे. 
मॉन्सूनची सुरवातीची कामगिरी समाधानकारक असली, तरी त्याने अद्याप संपूर्ण देश व्यापलेला नाही. पूर्वेकडील राज्ये मॉन्सूनच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे मॉन्सूनच्या कामगिरीकडे रिझर्व्ह बॅंकेचे लक्ष आहे. गेल्या महिनाभरात खनिज तेलाचे भाव कमी झाले आहेत; मात्र याच कालावधीत रुपयाचे अवमूल्यन झाल्याने डोकेदुखी वाढली आहे. भाजीपाल्याचे भाव चलनवाढीची दिशा ठरवतील. 
 
विकासदराचा अंदाज स्थिर 
रिझर्व्ह बॅंकेने जूनच्या पतधोरणाप्रमाणे विकासदराचा (जीडीपी) अंदाज स्थिर ठेवला आहे. 2018-19 या वर्षात अर्थव्यवस्थेची वाढ 7.6 टक्‍क्‍याने होईल, असा अंदाज रिझर्व्ह बॅंकेने व्यक्त केला होता. आजच्या बैठकीत हा अंदाज कायम ठेवण्यात आला. विकासदर पहिल्या सहामाहीत 7.5 ते 7.6 टक्के आणि दुसऱ्या तिमाहीत 7.3 ते 7.4 टक्‍क्‍यांदरम्यान राहील, असे बॅंकेने म्हटले आहे. 

Web Title: Second time repo rate boom